Sunday, December 22, 2024
Homeराज्यनांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता : नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन...

नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता : नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन…

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड जिल्ह्यात आज ३० एप्रिल व उद्या 1 मे 2024 रोजी काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

उन्हाचा कडाका वाढल्याने प्रादेशिक हवामान विभागाकडून जिल्ह्यात आज ३० एप्रिल व उद्या 1 मे 2024 रोजी तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे उष्माघातासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात, हे लक्षात घेऊन नागरिकांनी काळजी व उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

उष्णतेच्या लाटेदरम्यान लहान मुलं व वृद्ध यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. आरोग्याची काळजी घेताना या काळात सैल, हलके, फिक्या रंगाचे आणि सुती कपडे परिधान करावेत. हलका आहार घ्यावा, फळे आणि सलाद सारखे पचायला हलके असणारे अन्न खावे.

पुरेसे पाणी प्या. उन्हापासून बचाव करण्यासाठी गॉगल/छत्री/टोपी/बूट/चप्पल घालूनच घराबाहेर पडावे. प्रवास करताना पिण्याच्या पाण्याची बाटली आपल्याजवळ बाळगावी. शक्य असल्यास थंड पाण्याने आंघोळ करावी. घराबाहेरील उपक्रम/मैदानी उपक्रमा दरम्यान थोड्या-थोड्या वेळाने विश्रांती घेत चला व विश्रांतीची वारंवारता वाढवावी.

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी उष्माघाताची पुढील प्रमाणे लक्षणे आढळल्यास काळजी घ्यावी. डोकेदुखी, ताप, उलट्या, जास्त घाम येणे आणि बेशुध्द पडणे, अशक्तपणा जाणवणे, शरीरात पेटके येणे, नाडी असामान्य होणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत.

उष्माघाताची लक्षणे आढळल्यास अशा व्यक्तीला सावलीच्या ठिकाणी झोपवा, व्यक्तीचे कपडे सैल करा. त्याला द्रव पदार्थ जसे पाणी, ओ.आर.एस., फळांचा रस यापैकी एक पाजा. चहा किंवा कॉफी देण्याचे टाळा. तापमान कमी करण्यासाठी थंड पाण्याच्या पट्ट्या कपाळावर ठेवा.

बाधित व्यक्तीला तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जा आणि वैद्यकीय सल्ला घ्या. अतिकष्टाची कामे सकाळी किंवा संध्याकाळी करावीत. जेव्हा सूर्यप्रकाश प्रखर नसेल तेव्हाच अशी कामे करा. नागरिकांनी वरील काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाप्रशासनाने केले आहे.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: