Saturday, December 21, 2024
Homeराज्यआव्हान प्रिय आमदार मिटकरी यांना स्वग्रामातूनच मिळणार आव्हानांची यादी…त्या यादीने होणार मिटकरींची...

आव्हान प्रिय आमदार मिटकरी यांना स्वग्रामातूनच मिळणार आव्हानांची यादी…त्या यादीने होणार मिटकरींची गोची…

आकोट – संजय आठवले

आकोट तालुक्यातील ग्राम कुटासा येथील मूळ रहिवासी आमदार अमोल मिटकरी यांनी स्वतःला गरीब कार्यकर्ता म्हणवून राष्ट्रवादी पक्षाचे निष्ठावंत आमदार जितेंद्र आव्हाड यांना एक लक्ष रुपयांचे बक्षीस जाहीर करीत तुतारी फुंकण्याचे आव्हान दिले आहे.

पक्षनेता शरद पवार यांची अप्रत्यक्षपणे टर उडवण्याचा हा प्रकार असल्याने तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कमालीचा रोष निर्माण झाला आहे. त्यातूनच आमदार मिटकरी यांना आव्हानांची एक यादीच सोपविण्याची तयारी सुरू झाली आहे. ही यादी जाहीर झाल्यास मिटकरी यांच्या बोल घेवडेपणाची मात्र बरीच गोची होणार आहे.

सद्यस्थितीत प्रसार माध्यमांना खाद्य पुरविणारे आमदार म्हणून अमोल मिटकरी बरेच चर्चेत आहेत. विरोधकांना उत्तरे देणे, अजित पवारांची अवास्तव प्रशंसा करणे, त्यांच्या गद्दारीची भांडी घासून पुसून चकचकीत करणे, त्याकरिता अप्रत्यक्षपणे खुद्द शरद पवार यांची टर उडविणे, पण मानभावीपणे त्यांना बाप संबोधणे अशी वक्तृत्व कलेची विविध वळणे ते लीलया पार पाडीत आहे. त्यातच आपण उपरे आणि बांडगुळ आहोत हे सपशेल विसरून कर्तृत्ववान आणि निष्ठावान लोकांना बालिश आव्हाने देण्याचा कार्यभागही ते उरकून आहेत.

त्यातीलच एक भाग म्हणजे नुकतेच त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना दिलेले आव्हान हा होय. अजित पवारांच्या गद्दारीनंतर निवडणूक आयोगात शिरलेल्या राजकीय प्रभावाने शरद पवार यांचे गटाला तुतारी हे चिन्ह बहाल करण्यात आले आहे. या चिन्हाचा लोकार्पण सोहळा नुकताच रायगडावर पार पडला. त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तुतारी वाजविली.

त्याची टर उडविण्याकरिता आमदार मिटकरी यांनी आव्हाडांवर ताशेरे ओढले आहेत. त्यासोबतच त्यांनी एक लक्ष रुपयांचे बक्षीस जाहीर करीत विधानसभा परिसरात तुतारी वाजवण्याचे आवाहनही आव्हाड यांना दिले आहे. कदाचित २४ तास अजित पवारांची पुंगी वाजविणाऱ्या मिटकरींना या तुतारीने आपली पुंगी बंद पडण्याची भीती वाटत असावी. त्यामुळेच त्यांनी हा उपद्व्याप केला असावा.

वास्तविक यात्रेतून आणलेली पुंगी लहान मुले अकारणच तुटेपर्यंत वाजवतात. तुटल्यावर ती फेकून दुसऱ्या खेळण्यात गुंग होतात. परंतु तुतारीचे तसे नाही. कुणाच्यातरी विशेष आगमनाची वर्दी म्हणून तुतारी वाजविली जाते. नंतर काळजीपूर्वक ठेवून ती दुसऱ्या विशेष प्रसंगीच वाजविली जाते. पण तुतारीचे हे असामान्यत्व पुंगी वाजविणाऱ्याला ठाऊक नसते. त्यामुळेच मिटकरी यांनी तुतारी या वाद्याची टर उडविली. आणि आव्हाड यांना ती वाजवण्याचे आव्हन केले. ते ती वाजवीतील न वाजवतील हा भाग वेगळा. पण मिटकरींचे आव्हान मात्र अनेक प्रती आव्हानांना जन्म देऊन गेले आहे.

त्यातील पहिले आव्हान आहे, धनादेश लिहिण्याचे. त्यात मिटकरी सपशेल नापास झाले आहेत. धनादेश देऊन आपण काहीतरी विशेष करीत आहोत अशा आवेशात ते आपला अजागळपणा प्रदर्शित करून बसले. त्यांनी धनादेशात चक्क रकमेच्या जागी जितेंद्र आव्हाड यांचे नाव आणि नावाच्या जागी रक्कम लिहिली आहे. यावरून त्यांचे पुढे हा धनादेश वटवावयाचा होता की नव्हता हे सिद्ध करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

दुसरे आव्हान असे कि, त्यांनी दोन महिन्यांचा पगार बक्षिसा दाखल दिला, तर दोन महिने ते आपला घर प्रपंच कोणत्या पैशांवर भागविणार हे सिद्ध करण्याचे. त्यात आपल्या अजागळपणावर आपण गरीब कार्यकर्ता असल्याने धनादेश लिहिता येत नसल्याची त्यांनी सारवा सारव केली. परंतु या सारवा सारविनेही काही आव्हाने उभी ठाकली आहेत.

त्यातील पहिले आव्हान आहे, गरिबाकडे चेक बुक असते हे सिद्ध करण्याचे. दुसरे आव्हान आहे, गरीब माणूस लाखोंच्या पैजा लावतो हे सिद्ध करण्याचे. तिसरे आव्हान आहे, धनादेश लिहिता येत नाही तर तो लिहिण्याचा अगोचरपणा का केला हे सिद्ध करण्याचे. चौथे आव्हान आहे, या एक लक्ष रुपयांचा आयकर वगैरे भरलेला आहे की नाही ते सिद्ध करण्याचे. पाचवे आव्हान आहे, शरद पवारांना मिळालेल्या चिन्हाची पर्यायाने शरद पवारांची ही हेटाळणी आहे किंवा नाही हे सिद्ध करण्याचे.

या आव्हानांसोबतच मिटकरी यांच्या स्वग्राम कुटासा येथेही अनेक आव्हाने त्यांच्या प्रतीक्षेत आहेत. ती आव्हाने अशी आहेत कि, अमोल विद्यार्थी दशेत आपल्या आजोबांच्या किराणा दुकानात पुड्या बांधण्याचे काम करता करता गुरुदेव सेवा मंडळाचे कामही करायचा. त्या माध्यमातून चांगले गायचा, बोलायचा. ते गुण पारखुन लोकशाहीर भगवान गावंडे यांनी त्याला सिंदखेड राजा येथे येऊन जिजाऊ, शिवराय यांचे बाबत धडे दिले.

तिथेच त्यांनी त्याची ओळख संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांशी करून दिली. त्याच वेळी भगवान गावंडे यांनी अमोलला भाषणांच्या तारखा हि मिळवून दिल्या. त्याच माध्यमातून अमोल राष्ट्रवादीच्या आणि अजित पवार यांच्या संपर्कात आला. त्यानंतर आमदार होईपर्यंत अमोलने भगवान गावंडे यांचेशी जो कृतघ्नपणा केला त्या संदर्भातील प्रश्न आज आव्हान बनून मिटकरी यांचे प्रतीक्षेत आहेत.

संभाजी ब्रिगेडचे काम करीत असताना अमोलला जवळ केले कुटासा येथील विजयसिंह सोळंके यांनी. त्यांनी त्याला लहान भावासारखी वागणूक दिली. गावातील राजकारणात त्याला मोठा केला. वेळप्रसंगी सगळी मदत केली. त्यानंतर कृतघ्नपणाचा वारसा जपत अमोलने विजयसिंह यांचेशी केलेल्या वर्तणुकीचे प्रश्न आजही आव्हान बनून आमदार मिटकरी यांचे प्रतीक्षेत आहेत.

त्यांनी गावात ग्रामपंचायतीचे पॅनल लढविले. पण एकही ग्रामपंचायत सदस्य त्यांचा नाही. तो का नाही? याचा तपास करण्याचे आव्हान मिटकरी यांचे समोर आहे. गावातील पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष यापैकी आमदार मिटकरी यांचा कुणीच नाही. हे आव्हानही त्यांचेसमोर आहे. आमदार मिटकरींचे स्विय सहायक असलेले, सरपंच पदाचे गाजर दिलेले श्याम राऊत कोठे आहेत? हे शोधण्याचे आवाहनही मिटकरी यांचे समोर आहे.

आमदार झाल्यानंतर जिल्ह्यातील जुन्या राष्ट्रवादीचे नामवंत नेत्यांशी मिटकरी यांचे का जुळले नाही? अजित गटात त्यापैकी चार दोनच नेते का गेले? जे गेले तेही मिटकरी सोबत न जाता स्वमार्गाने का गेले? आता अजित गटाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांचेशी मिटकरींचे का जमत नाही? जिल्ह्यातील कर्तबगार युवा नेता शिवा मोहोड यांची सावली ही मिटकरींना का सहन होत नाही?

अजित गटाला राष्ट्रवादीचे चिन्ह आणि त्यांचे आमदारांना क्लिनचीट मिळाल्यानंतर अख्खा महाराष्ट्रभर अजित गटाने जल्लोष केला. पण मिटकरींचे स्वग्राम कुटासा येथे एक फटाकाही का फुटला नाही? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आव्हान आमदार मिटकरी यांचे समोर आहे. ही सारी आव्हाने असताना आणि आपले घर गूडूप काळोखात बुडालेले असताना आमदार मिटकरी मात्र उजळ माथ्याने तुतारी वाजवण्याचे बालिश आव्हान देत आहेत.

वास्तविक आमदार जितेंद्र आव्हाड लोकप्रिय आहेत. त्यांनी साद घालताच हजारांची गर्दी उभी राहते. त्यांच्या मतदारसंघात प्रत्येक ठिकाणी त्यांचे प्राबल्य आहे. शरद पवारांप्रती त्यांची निष्ठा वादातीत आहे. छत्रपती शिवराय, महात्मा फुले, छत्रपती शाहू, बाबासाहेब आंबेडकर यांचे ते निर्विवाद पाईक आहेत. असा जनाधार आणि कर्तृत्व असलेल्या माणसाला शरद पवारांशी, आपल्या गावाशी, तालुक्याशी, जिल्ह्याशी, आपल्या उपकारकर्त्यांशी कृतघ्नपणा करणाऱ्या जनाधारहीन, कर्तृत्वहीन, अजित पुंगी वादक आमदार मिटकरी यांनी आव्हान देणे हे मात्र मोठे कोडे आहे.

मिटकरी यांचे आमदारकी बाबत एक किस्सा सांगितला जातो. त्यांच्या भाषणांनी प्रभावीत झालेल्या अजित पवार यांनी त्यांना विधान परिषदेवर घेण्याची शिफारस शरद पवार यांचेकडे केली. त्यावेळी “लोकांसमोर याची भाषणे बरी आहेत. मात्र संसदीय कामकाजात त्याला महत्त्व नाही”. असा शेरा शरद पवारांनी दिला होता. आमदार मिटकरी यांनी दिलेले “तुतारी वाजवा” हे बालिश आव्हान पाहू जाता शरद पवारांचे ते बोल किती सार्थ होते, याची आज प्रचिती आली आहे.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: