आकोट – संजय आठवले
तेल्हारा बाजार समिती सभापती व उपसभापती यांनी ९ लक्ष ४६ हजार ५९२ रुपयांचे देयक काढणे करिता एक लक्ष रुपयांची लाच घेतल्याने त्या दोघांनाही अकोला लाच प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. त्यांचेवर पोलीस ठाणे तेल्हारा येथे रीतसर गुन्हा दाखल झाला असून या घटनेने संपूर्ण तेल्हारा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
घटनेची हकीकत अशी कि, तक्रारदाराने दिनांक २०.०९.२३ रोजी लाच प्रतिबंधक विभाग अकोला येथे तक्रार दिली कि, तेल्हारा बाजार समितीमधील सन २०२२-२३ चे शासनाचे आधारभूत किंमत योजनेअंतर्गत नाफेड खरीप व रब्बी हंगाम हरभरा खरेदी करिता तक्रारदाराने हमालपुरवठा केला होता. तसा करारही बाजार समिती तेल्हाराशी केला होता.
शासकीय दरानुसार प्रति क्विंटल रुपये ४४ प्रमाणे १४ लक्ष ३९ हजार ५९२ रुपये मिळणे करिता तक्रारदाराने सचिव सुरेश सोनोने यांचे कडे जून २३ मध्ये देयक सादर केले होते. ते मंजूर होऊन त्यातील ४ लक्ष ९३ हजार रुपये रक्कम देण्यात आली. उर्वरित रक्कम ९ लक्ष ४६ हजार ५९२ अद्याप बाकी आहे.
ही रक्कम मिळणे करिता तक्रारदाराने बाजार समितीला लेखी अर्ज दिला. त्यावर सभापती सुनील इंगळे, उपसभापती प्रदीप ढोले व सचिव सुरेश सोनोने यांनी तक्रारदाराकडे एक लक्ष रुपयांची मागणी केली. त्या अनुषंगाने दि.२१.०९.२३ रोजी लाच प्रतिबंधक विभाग अकोलाने लाच मागणी पडताळणी केली.
त्यावेळी उपसभापती प्रदीप ढोले यांनी तक्रारदारास एक लक्ष रुपयांची मागणी केल्याचे व सभापती सुनील इंगळे यांनी त्याला प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर २५.०९.२३ रोजी सापळा लावण्यात आला. त्यात उपसभापती यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. सभापती यांनाही ताब्यात घेण्यात आले. या दोघांवरही पोलीस स्टेशन तेल्हारा येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार, पोलीस अंमलदार दिगंबर जाधव, श्रीकृष्ण पळसपगार, निलेश शेगोकार, संदीप ताले, किशोर पवार, अभय बावस्कर, सुनील येलोने, पुरुषोत्तम मिसूरकर, अर्चना घोडेस्वार, चालक सहा.पोउनि दिलीप तीवळकर यांनी केली