अकोट – संजय आठवले
अवैध सावकारी करणाऱ्या विरोधात झालेल्या तपासणीत तो अवैध सावकारी करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्या संदर्भात सहायक निबंध आकोट यांनी दिलेल्या तक्रारीवरून आकोट शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे.
आकोट शहरातील नरसिंग कॉलनी पूर्व उद्यान येथे राहणारा रवींद्र राधाकिशन कासट हा मोठ्या प्रमाणात अवैध सावकारी करतो. त्याचे घरी साक्षर्या केलेले व कोरे असे काही धनादेश, बंधपत्रे (स्टॅम्प पेपर), खरेदी खते, गहाण खते आहेत.
त्यांचे आधारे कासट लोकांना अवाच्या सवा दराने कर्ज देतो अशा आशयाची तक्रार सुरेश उत्तम नारे, शुभम गणेश नारे, सेवक राम काशिनाथ धुमाळे यांनी उपनिबंधक कार्यालय अकोला येथे केली. त्यावरून दिनांक ३१.८.२०२१ रोजी छापा मारण्यात आला.
या छाप्यात कासटचे घरी एकूण बारा दस्त जप्त करण्यात आले. त्यामध्ये हिशेब असलेल्या वीस डायऱ्या, ८ वह्या यांसह कच्ची टिपणेही जप्त करण्यात आलीत. हे दस्त तो कर्जदाराकडून गहाण तारण आणि प्रतिभूती म्हणून ठेवून घेतो. त्या दस्तांचे आधारे तो परिसरातील लोकांची दिशाभूल करतो. लोकांची संपत्ती हडप करण्याची दृष्टीने आणि त्या मालमत्तेस हानी पोहोचविणे करिताही तो या दस्तांचा उपयोग करतो. असे तपासात निष्पन्न झाले.
यासोबतच रवींद्र कासट हा त्याची पत्नी संगीता हिचे नावावरही असे अवैध व्यवहार करतो. हा व्यवहार दोघेही पती-पत्नी संगनमताने करीत आहेत. हे सुद्धा सक्षम दस्तांचे आधारे स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यामुळे रवींद्र राधाकिसन कासट याच्यावर महाराष्ट्र सावकारी विनियम अधिनियम २०१४ चे कलम ३९, ४४, ४८, अन्वये गुन्हा दाखल करण्याची शिफारस आकोट शहर पोलीस स्टेशन यांना करण्यात आली. त्या तक्रारीवरून आकोट पोलिसांनी रवींद्र राधाकिशन कासट राहणार नरसिंग कॉलनी आकोट याचेवर गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास स्वतः ठाणेदार तपन कोल्हे करीत आहेत.