आकोट – संजय आठवले
लाच मागणी केली परंतु ती देणाऱ्याचा संशय आल्याने ती लाच न स्वीकारताही लाचखोराला पोलीस कारवाईला सामोरे जावे लागल्याची घटना तेल्हारा तहसील कार्यालयात घडली आहे. घटनेची हकीगत अशी आहे कि, या प्रकरणातील २४ वर्षीय पुरुष फिर्यादी हा रेती वाहून नेण्याचा व्यवसाय करतो. हा व्यवसाय सुरळीत चालविणेकरिता सदर व्यवसायिकाने संबंधित महसूल अधिकाऱ्यांना खुष ठेवण्याचा प्रयास केला. त्याकरिता तेल्हारा तहसील कार्यालयातील वर्ग तीन लिपिक वैभव फुलचंद जोहरे याला १० हजार रुपये प्रतिमाह देण्याचे ठरले.
त्यानुसार रेती व्यवसाय सुरू झाला. परंतु काही कारणाने व्यावसायिक ठरलेली रक्कम वेळेवर देऊ शकला नाही. असे सतत तीन महिने झाले. त्यामुळे ही थकीत रक्कम ३० हजार रुपये झाली. ती आपणास अदा करावी असा तगादा जोहरे याने व्यावसायिका मागे लावला. त्याने त्रस्त होऊन सदर व्यवसायिकाने लाच प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांचेकडे तक्रार नोंदविली.
त्या अनुषंगाने लाच प्रतिबंधक विभागाने दिनांक ३ मार्च २३ रोजी पडताळणी केली.
या पडताळणीमध्ये वैभव जोहरे ह्याने व्यावसायिकास ३० हजार रुपयांची मागणी केल्याचे सिद्ध झाले. ही रक्कम शेगाव नाका तेल्हारा येथे देण्याचे ठरले. त्यानुसार दिनांक १६ मार्च २३ रोजी व्यावसायिक ३० हजार रुपये घेऊन जोहरे याचेकडे गेला. परंतु त्याला व्यवसायिकाची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्याने ती रक्कम स्वीकारली नाही. त्यावरून लाच प्रतिबंध विभागाने जोहरे या ताब्यात घेतले.
हा २९ वर्षीय वैभव फुलचंद जोहरे गाडेगाव रोड तेल्हारा येथे राहत असून तो मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील रहिवासी आहे. त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मारुती जगताप, पोलीस अधिक्षक, अरुण सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक, देविदास घेवारे, अप्पर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी एस.एन.चौधरी, पो.उप अधीक्षक, ला.प्र.वि. बुलडाणा पोहेकॉ. विलास साखरे, नापोकॉ. प्रवीण बैरागी, रविंद्र दळवी, विनोद लोखंडे, पो.शि.अ.काझी, अर्शद शेख ला.प्र.वि बुलडाणा यांनी केली.