मूर्तिजापूर – विलास सावळे
मूर्तिजापूर शहरातील पोलिस यंत्रणेला सध्या नागरिकांच्या तीव्र नाराजीचा सामना करावा लागतो आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून शहरात चोरट्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे आणि अवैध धंद्यांनाही उधाण आले आहे.
विशेषतः शहराच्या मध्यभागी असलेल्या बस स्टँड व रेल्वे स्टेशन परिसरात चोरीच्या घटनांमध्ये भर पडली आहे. मंगळवार बाजाराच्या दिवशी मोबाईल चोरीसारख्या घटनांनी अधिकच धक्का दिला आहे.
28 डिसेंबरच्या रात्री, अज्ञात चोरट्यांनी दोन घरफोड्यांची घटना घडवून आणली. त्यात दोन्ही घरांचे कडी-कोयडे तोडून, घरातील मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या. यामध्ये एकूण 61 हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश नगरच्या स्टेशन विभागात असलेल्या शांतीनगर परिसरात ही घटना घडली. राजेश भातखेडे आणि त्यांचे शेजारी दिनेश किसन बाहे यांचे घर रात्रभर लुटले गेले. दोघेही घरगुती कामानिमित्त बाहेर गावी गेले होते.
या संधीचा लाभ घेत अज्ञात चोरट्यांनी राजेश भातखेडे यांच्या घरातील 20,000 रुपये रोख रक्कम, तीन ग्राम सोन्याच्या दागिन्यांची नथ, एक ग्राम सोन्याचे अंगठी आणि चांदीचे भांडे चोरले. तसेच, दिनेश किसन बाहे यांच्या घरातील दोन-अडीच ग्राम सोन्याच्या अंगठ्या, तीन ग्राम सोन्याचे कानातले, चांदीच्या 20 ग्राम भांड्यांसह 12,000 रुपये रोख रक्कमही चोरीला गेली. या चोरीच्या घटनांमुळे एकूण 36,000 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
पोलिसांच्या नोंदीनुसार, ही गेल्या महिनाभरातील दहावी चोरीची घटना आहे. या चोरीच्या घटनांवर पोलिसांची गती मंद असतानाही चोरांचा मागोवा घेण्यात यश मिळालेले नाही. यामुळे नागरिकांमध्ये घबराट आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरवासीयांनी आता पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, चोरांच्या कारवाईला आळा घालण्यासाठी पोलिसांनी अधिक कडक उपाययोजना घेण्याची मागणी केली आहे. “कुठे नेऊन ठेवले आहे माझं मुर्तीजापुर?” असा प्रश्न अनेक नागरिक विचारत आहेत. शहरात चोरांच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे नागरिकांचे जीवन असुरक्षित बनले आहे आणि त्यामुळे शहरात एक धाकधूक निर्माण झाली आहे.
मुर्तीजापुर शहरात या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस निरीक्षकांनी पोलिसांसाठी तातडीच्या मार्गदर्शनाच्या सूचना दिल्या पाहिजे . शहरात चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्याची मागणी सध्या नागरिकाकडून जोर धरत आहे.