Budget 2024 : मोदी सरकारच्या 2.0 च्या शेवटच्या वर्षात केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात विशेषतः मध्यमवर्गीयांसाठी काही योजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये सीतारामन यांनी मध्यमवर्गीयांसाठी स्वतंत्र गृहनिर्माण योजना सुरू करण्याबाबत बोलले. एवढेच नाही तर मध्यमवर्गीयांना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी छतावरील सौरऊर्जेबाबत मोठी घोषणा केली. यामुळे मध्यमवर्गीयांना दरवर्षी विजेवर मोठ्या प्रमाणात खर्च होणारा पैसा वाचण्यास मदत होईल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
मध्यमवर्गीयांसाठी काय घोषणा?
मध्यमवर्गीयांसाठी घरे
अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, सरकार मध्यमवर्गासाठी नवीन योजना आणणार आहे. त्या म्हणाल्या की, आमचे सरकार भाड्याची घरे किंवा झोपडपट्टी किंवा चाळी आणि अनधिकृत वसाहतींमध्ये राहणाऱ्या पात्र मध्यमवर्गीय लोकांना स्वतःचे घर विकत घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठी मदत करणार आहे.
छतावरील सौरीकरण आणि मोफत वीज
सीतारामन यांनी आणखी एका मोठ्या योजनेद्वारे मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी मदत जाहीर केली. रूफटॉप सोलर एनर्जी योजनेच्या कक्षेत एक कोटी कुटुंबांना आणण्याबाबत त्यांनी सांगितले. सीतारामन यांच्या घोषणेनुसार, रूफटॉप सोलर सिस्टीम बसवून, एक कोटी कुटुंबांना दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळू शकेल. अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेच्या ऐतिहासिक दिवशी माननीय पंतप्रधानांनी केलेल्या ठरावाच्या अनुषंगाने ही योजना आणण्यात आली आहे. यातून अपेक्षित फायदे पुढीलप्रमाणे आहेत
मोफत सौरऊर्जा आणि अतिरिक्त वीज वितरण कंपन्यांना विकून कुटुंबांची दरवर्षी पंधरा हजार ते अठरा हजार रुपयांची बचत…
इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग…
पुरवठा आणि स्थापनेसाठी मोठ्या संख्येने विक्रेत्यांसाठी उद्योजकतेची संधी…
उत्पादन, स्थापना आणि देखभाल यातील तांत्रिक कौशल्य असलेल्या तरुणांसाठी रोजगाराच्या संधी…