फौजदारी प्रकरण न्यायालयात चालविण्याचे आदेश…चार वर्षानंतर निघाले आदेश…
पातूर- येथील 2019 मधील तत्कालीन ठाणेदाराने एका प्रकरणात आरोपीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत आरोपीच्या हाताला फ्रॅक्चर झाले. तरी आरोपींच्या उपचारामध्ये हयगय करण्यात आली. याप्रकरणी संबंधित आरोपीने न्यायालयासमोर आपली बाजू मांडल्यानंतर सर्व तपास करण्यात आला व चार वर्षानंतर संबंधित ठाणेदाराविरुद्ध न्यायालयात खटला चालविण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, 2019 मध्ये पातुर तालुक्यातील दामोदर राऊत यांच्याविरुद्ध एक प्रकरण दाखल होते. या प्रकरणात तत्कालीन ठाणेदार गुल्हाने यांनी आपल्या पोलिस ठाण्याचे काही सहकारी सोबत घेऊन 7 सप्टेंबर 2019 रोजी दामोदर राऊत यांना त्यांच्या घरून पोलिसांच्या गाडीत बसवून पोलीस ठाण्यात आणले व तेथे बेदम मारहाण केली. या मारहाणीत दामोदर राऊत यांच्या हाताला जबर मार लागल्याने त्यांचा हात फ्रॅक्चर झाला. त्यामुळे त्यांनी आपल्याला दवाखान्यात नेण्याची विनंती केली तर ठाणेदारांनी त्यांच्या उपचारांमध्ये प्रचंड दिरंगाई दाखविली. त्यानंतर उशिराने त्यांना दवाखान्यात देण्यात आले. त्यांच्या हाताला गंभीर दुखापत असल्याचे दिसून आल्याने पातुर येथील डॉक्टरांनी त्यांना अकोला येथील सामान्य रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. परंतु ठाणेदारांनी पुन्हा दिरंगाई दाखविली व दुसऱ्या दिवशी दुपारी राऊत यांना अकोला सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी राऊत यांच्या हाताला प्लास्टर करणे आवश्यक असल्याचे सांगितल्यानंतरही ठाणेदारांनी प्लास्टर न करता त्यांना परत पातुर पोलीस ठाण्यात आणले.
त्यानंतर न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्यांना धमकावण्यात आले व कोणतेही वैद्यकीय कारण न्यायालयासमोर मांडू नये म्हणून सांगितले. पण दामोदर राऊत यांनी पातुर न्यायालयासमोर झालेला सर्व प्रकार सांगून त्यांना उपचाराची गरज असल्याचे सांगितले. तेव्हा पातुर न्यायाधीशांनी त्यांचे बयान नोंदवून घेतले. सर्व हकीकत जाणून घेतली व या गंभीर प्रकाराची माहिती अकोला जिल्हा व सत्र न्यायाधीश यांना दिली. त्यांनी या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी बाळापूर येथील न्यायाधीशांना दिली. बाळापुर न्यायाधीशांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून अहवाल अकोला न्यायाधीशांकडे सादर केला. या प्रकरणात झालेल्या तपासात दामोदर राऊत यांनी त्यांच्यासोबत झालेल्या प्रकाराची सांगितलेली हकीकत सत्य असल्याचे व ठाणेदारांनी चूक व गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यावरून पातुर येथील जे. एम. एफ. सी. कैलास कुरंदळे यांनी याप्रकरणी सीआरपीसी च्या कलम 204 नुसार ठाणेदाराविरुद्ध भादंविच्या कलम 326, 509, 506 नुसार प्रकरण न्यायालयात चालविण्याचे आदेश काढले आहेत. 30 ऑगस्ट रोजी हे आदेश काढण्यात आले असून या प्रकरणात पुढे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
याप्रकरणी पातूर न्यायालयाने पातुर पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार गजानन गुल्हाने यांच्यावर न्यायालयात खटला चालविण्यासाठी सीआरपीसी च्या कलम 204 नुसार कारवाई करण्यासाठी आरोपी म्हणून समन्स काढला आहे
आपल्या वर्दीचा व पदाचा दुरुपयोग करून सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या गजानन महादेव गुल्हाने सारख्या ठाणेदाराला योग्य शिक्षा मिळायला हवी. चार वर्षानंतर का होईना पण आता आपल्याला न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.- दामोदर राऊत