पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार.
मुंबई, दि. १३ मे २०२४
भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. याच प्रज्वल रेवन्नांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मते मागितली आहेत. रेवन्नाचा भांडाफोड होताच त्याला भारतातून परदेशी पळून जाऊ दिले. महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्रज्वल रेवन्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्द बोलले नाहीत. या अत्याचारी नराधमाला परदेशातून भारतात आणावे व कडक कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अलका लांबा यांनी केली आहे.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना अलका लांबा पुढे म्हणाल्या की, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना भारतीय जनता पक्षाने नेहमीच पाठिशी घातले आहे, त्यांच्यावर कारवाई केली नाही. महिला खेळाडूंवर अत्याचार करणारा भाजपाचा खासदार ब्रिजभूषण सिंह याच्यावर कारवाई केली नाही. महिला काँग्रेसने आवाज उठवला व सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला पण अद्याप कारवाई शून्य आहे. भाजपाने त्यांच्या मुलाला लोकसभेची उमेदवारी दिली आहे. मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार झाले पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शब्द काढला नाही. कुलदिप सेंगर सारख्या बलात्कारी नेत्यांना भाजपाने संरक्षण दिले आहे. यातूनच भाजपाचे चाल, चरित्र व चलन कसे आहे हे स्पष्ट होते.
महिला अत्याचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन बाळगले असून त्यांनी दोन शब्द बोलावे अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १५ मे व १७ मे रोजीच्या मुंबई दौऱ्यावेळी महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवून, मोदी मुर्दाबादच्या घोषणा देत निषेध करणार आहे. भाजपा सरकारने कितीही यंत्रणा लावली तरी महिला काँग्रेस नरेंद्र मोदींच्या विरोधात ताकदीने आंदोलन करुन महिला अत्याचारावर जाब विचारणार आहे, असेही अलका लांबा यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी लोकांच्या खाण्यावर टीका केली, मासे, मटन यावर ते बोलले, त्यानंतर महिलांचे मंगळसुत्र काँग्रेस हिरावून घेईल असे म्हणाले तर गुजरातमध्ये प्रचार करताना मोदी म्हणाले की, तुमच्याकडे दोन म्हशी असतील काँग्रेस त्यातील एक म्हैस काढून घेणार आहे, अशी बेताल विधाने पंतप्रधान मोदी करत आहेत परंतु याचा जनतेवर काहीही परिणाम होत नसून देशभरात मोदी सरकारच्या विरोधात वातावरण आहे. लोकांमध्ये भाजपा सरकारविरोधात तीव्र संताप आहे. दक्षिण भारत, उत्तर भारतासह सर्वच राज्यात इंडिया आघाडीला अनुकूल वातावरण आहे, असेही अलका लांबा यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अनिषा बागुल उपस्थित होत्या.