सध्या लग्नाचे सीजन सुरु असून या सीजन मध्ये अनेक चांगल्या वाईट घटना घडतात. तर उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात एक अतिशय वेदनादायक घटना घडली आहे. हनिमूनच्या दुसऱ्या दिवशी वराचा मृत्यू झाला. वराचा मृत्यू झाल्याने घरात एकच गोंधळ उडाला. तर नवरी बेशुद्ध पडली. शुद्धीवर आल्यावर ती एकच विचारत होती, ‘माझा काय दोष, माझ्यासोबत असं का झालं’. याची माहिती मिळताच वधूचे पालकही तेथे पोहोचले. लग्नाच्या आनंदाचे अवघ्या काही तासांत शोकात रूपांतर झाले.
ही घटना करहल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागला कंस गावातील आहे. गावातील रहिवासी जानवेद यांचा मुलगा सोनू (21) हा बीएचा विद्यार्थी होता. किश्नी पोलीस स्टेशन हद्दीतील नागला सदा सौज गावात राहणाऱ्या आरतीसोबत त्याचे लग्न ठरले होते. 11 मे रोजी किष्णी येथील हनुमानगढी येथील विवाह गृहात मोठ्या थाटामाटात हा विवाह पार पडला.
यानंतर 12 मे रोजी पत्नीला घेवून ते घरी आले. तरुण सुनेच्या आगमनाने घरात आनंदाचे वातावरण होते. घरातील नातेवाईक आदींच्या उपस्थितीत दिवसभर कार्यक्रम सुरूच होते. सोनू शनिवारी सायंकाळी इन्व्हर्टरची वायरिंग करत होता. त्यानंतर त्याला विजेचा धक्का बसला. यावर तो बेशुद्ध पडला.
बेशुद्ध झाल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने सैफई मेडिकल कॉलेजमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. मृत्यूचे वृत्त समजताच कुटुंबात शोककळा पसरली. विवाहितेच्या घरातील आनंदाचे रूपांतर शोकात झाले. पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह गावात आणण्यात आला. रविवारी शोकाकुल वातावरणात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.