३ एप्रिल रोजी होणार सामूहिक विवाह सोहळा…
रामटेक – राजु कापसे
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या १०३ व्या जयंती पर्वावर व्यसनमुक्ती अभियानांतर्गत परमात्मा एक आनंदधाम, रामटेक येथील ‘आनंदी आनंद’ या लॉनमध्ये यावर्षीचा आदर्श सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन बुधवार, ३ एप्रिल २०२४ करण्यात येणार आहे.
हा आदर्श विवाह सोहळा सर्व जाती, पंथ, सर्व मार्ग, जाती पंथ व सर्वधर्मीय आहे. तसेच महत्त्वाचे व उल्लेखनीय म्हणजे हा विवाह सोहळा निःशुल्क आहे. त्याच धर्तीवर शनिवार, १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत वर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन परमात्मा एक आनंदधाम, रामटेक येथे करण्यात आले आहे, अशी माहिती लक्ष्मणराव मेहर (बाबूजी) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जनतेचा चौदा वर्षांतील आदर्श विवाह सोहळ्याला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती गौरव पुरस्कृत व बँड अँबेसिडर लक्ष्मणराव मेहर (बाबूजी) यांच्या सौजन्याने गेल्या १४ वर्षांपासून भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे.
यानुसार यंदाही या वर-वधू परिचय मेळाव्यात विवाहासाठी इच्छुक वर- वधूनी स्वतःचे परिचय पत्र आणि आई-वडिलांसह सहभाग नोंदवावा. तसेच आनंदधाम रामटेकच्या या सामाजिक कार्यात सर्व जनतेने मोठ्या संख्येने सहभागी होऊन सत्कार्याबाबत गरजवंतांना माहिती द्यावी, असे आवाहन आनंदधामचे राष्ट्रीय अध्यक्ष व युवा मार्गदर्शक बजरंग मेहर यांनी केले आहे.