ओडिशाचे आरोग्य मंत्री नब दास यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय. ब्रजराजनगर येथील गांधी चौकात एका कार्यक्रमादरम्यान त्यांच्याच सुरक्षेसाठी तैनात असलेल्या ASI ने गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यानंतर नबा दास यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नबा दास यांच्या छातीवर गोळी लागली आहे.
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या सुरक्षेत तैनात असलेले एएसआय गोपाल दास यांनी नबा दास यांच्यावर गोळीबार केला. आरोग्यमंत्र्यांवर पाच गोळ्या झाडण्यात आल्या. नबा दास कारमधून खाली उतरताच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मात्र, प्राथमिक तपास सुरू झाला आहे. त्याचवेळी आरोपी एएसआय गोपाल दास हा फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.
भुवनेश्वरला एअरलिफ्ट करण्याची तयारी
नबा दास यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, मंत्री नाबा दास यांना भुवनेश्वरला विमानाने नेण्याची तयारी सुरू आहे. आरोग्यमंत्र्यांवर झालेल्या हल्ल्याची माहिती मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना देण्यात आली आहे. नबा दास हे बीजेडीचे ज्येष्ठ नेते आहेत. अलीकडेच तो शनि मंदिरात १.७ किलो सोन्याचा कलश अर्पण केल्याने प्रसिद्धीझोतात आले होते.