न्यूज डेस्क : यूपीच्या सहारनपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भीम आर्मीचे व आझाद समाज पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर देवबंद भागात हल्ला झाला आहे. हरियाणा क्रमांकाच्या कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी आझाद यांच्यावर गोळीबार केला. आझादच्या पोटावर आणि कमरेला गोळ्या लागल्या आहेत. जखमी अवस्थेत त्यांना देवबंदच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हल्ल्यानंतर चंद्रशेखर आझाद यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाबाबत सहारनपूरचे एसएसपी यांनी डीजीपी यांना फोनवरून घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे. भीम आर्मीने आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करतानाच कडक कारवाईची मागणी केली आहे. याशिवाय राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्या सुरक्षेचीही मागणी करण्यात आली आहे.
दुसरीकडे, आरएलडीचे स्थानिक आमदार मदन भैया यांनी सांगितले की, त्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.