अमरावती जिल्हाकचेरी परिसरातील खासदारांच्या कार्यालयाचे कुलूप तोडून ते ताब्यात घेतल्याबद्दल आंदोलकावर भारतीय दंड संहिता 1860 नुसार कलम 143,149,427,135 गुन्हा गाडगे नगर पोलिसात दाखल करण्यात आला आहे. यामध्ये खासदार बळवंत वानखडे, आमदार यशोमती ठाकूर, बबलू शेखावत, विलास इंगोले, प्रवीण मनोहर, हरीश मोरे, वैभव वानखडे, योगेश वानखडे, यांच्या सह आणखी 10 काँग्रेस कार्यकर्ते समावेश आहे.
अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार पदी महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे निवडून आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेले खासदार कार्यालय ताब्यात देण्यात यावे यामागणीसाठी वारंवार जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार, भेटून विनंती करण्यात आली. मात्र, वारंवार विनंती करूनही खासदार कार्यालयाचा ताबा न दिल्याने काल खासदार बळवंत वानखडे, आ. यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत कार्यालय ताब्यात देण्याची विनंती केली होती. परंतु जिल्हाधिकारी यांनी कार्यालय ताब्यात न दिल्याने आमदार यशोमती ठाकूर यांनी आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार घोषणाबाजी करत खासदार कार्यालयाचे कुलूप तोडून कार्यालय ताब्यात घेतले.
अमरावतीचे जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त भाजप सरकारच्या दबावात काम करीत असल्याचा आरोप यावेळी खासदार बळवंत वानखडे व आ. यशोमती ठाकूर यांनी केला होता.