पातुर – निशांत गवई
२ ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान बोर्डखा, चिंचखेड व घाटमाथा या परिसरात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस आल्याने नदी नाल्यांना मोठा पूर आला.
1994 नंतर सर्वात मोठा महापूर हा यावेळी शेतकऱ्यांना पहावयास मिळाला बोडखा व चिंचखेड या परिसरातील नदी लगतच्या सर्व शेती ही या महापुरामुळे खरडून गेली असून यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे फळबाग, सोयाबीन, कपाशी व शेतीचे साहित्य पाण्यात वाहून गेले.
नदीला अचानक आलेल्या पावसामुळे या दोन्ही गावाचा संपर्क तुटला होता या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी तहसीलदार व पत्रकार यांना देतास या दोन्ही गावांना पातुर तहसीलदार वानखडे व त्यांचे कर्मचारी तसेच पत्रकार उमेश देशमुख, मोहन जोशी, निखिल इंगळे यांच्यासह समाजसेवक दीपक धाडसे यांनी दोन्ही गावांना भेट देऊन गावाची पाहणी केली व गावकऱ्यांना धीर देऊन सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या.
बोडखा येथील प्रदीप काळपांडे त्यांच्या शेतातील लिंबूची झाडे ही पूर्णता खरडून गेली असून नदीलगत असलेल्या शेतकरी तुळशीराम चव्हाण, लक्ष्मण गोबरा राठोड, मोहन राठोड, गुलाब अवचार, श्रीकृष्णा चव्हाण, बब्बू, मोहम्मद मेहताब ,रामेश्वर राठोड, रामसिंगजी जाधव, यांच्यासह शेकडो हेक्टर जमीन ही पाण्याने खरडून गेली असून शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नुकसानीची तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना बाळापुर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी दिल्या असून शेतकऱ्यांच्या शेतीचे ताबडतोब पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.