अकोला – संतोषकुमार गवई
वसंत ॠतूतील मनमोहक बदल व विविध प्रकारच्या सण, उत्सवातून मिळणाऱ्या आनंद, उत्साहात या वेळी आकाशही सहभागी होत असल्याने सर्वांनी यात सहभागी होण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी केले आहे.
चंद्रा सोबत दोन ग्रहांची युती
सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी शूक्र ग्रह आणि लालसर रंगाचा मंगळ ग्रह दि.८ मार्च महाशिवरात्रीचे पहाटे पूर्व आकाशात चंद्रकोरी जवळ मंगळ व शूक्र ग्रह युती स्वरूपात मकर राशी समुहात बघता येतील.
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन दर्शन
वसंतातील आसमंतात भर देण्यासाठी जगातील सोळा देशांनी मिळून तयार केलेले इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जेव्हा आपल्या भागातुन जाते तेव्हा ते आपल्याला नुसत्या डोळ्यांनी पाहता येईल.अंतराळ अभ्यास व संशोधन केंद्र प्रचंड वेगाने पृथ्वीभोवती फिरते,मुंबई ते नागपूर अंतर केवळ दोन सेकंदात पूर्ण करते. हा अनोखा आकाश नजारा पाच दिवसांत सात वेळा पाहता येईल.
दि.८. च्या पहाटे ६-०६ वा. पाच मिनिटे,दि.९ ला.रात्री ८-१६वा.दि.१० रोजी पहाटे सूर्योदयापूर्वी ६-०६ व रात्री ७-२८ वा,दि.११ ला पहाटे ५-२० व रात्री ८-१७ वा. आणि दि.१२.मार्चला रात्री ७-२८ वाजताच्या सुमारे सहा मिनिटांच्या दर्शनाने या आकाश उत्सवाची सांगता होईल.
बुध व शनी या दोन ग्रहांचे उदय
सूर्याला सर्वात जवळ असलेला बुध ग्रहाचा उदय दि.१० मार्च रोजी सूर्यास्तानंतर पश्चिमेस आणि सूर्यमालेतील सर्वात सुंदर व वललांकित असलेला शनी ग्रह दि.१४ रोजी पहाटे पूर्व क्षितिजावर उदय होत असुन दूर्बिणीतून याच्या मनोहारी वलय बघता येईल,मात्र काही कालावधीनंतर पृथ्वी, सूर्य व शनी ग्रह यांच्या स्थितीतील बदलामुळे असा अनुपम आकाश नजारा बघता येणार नाही म्हणून आकाश प्रेमींनी या अनोख्या खगोलीय घटनेचा आनंद अवश्य घ्यावा.