Monday, December 23, 2024
Homeराजकीयमविआच्या मोर्चाविरोधात भाजपाचे आंदोलन म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’!: नाना पटोले...

मविआच्या मोर्चाविरोधात भाजपाचे आंदोलन म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’!: नाना पटोले…

महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भाजपाने आधी जनतेची जाहीर माफी मागावी.

प्रभूरामाच्या नावावर स्वतःचे खिशे भरणाऱ्यांनी हिंदू देवदेवतांवर बोलू नये.

मुंबई, दि. १६ डिसेंबर २०२२

महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र विकास आघाडीच्या १७ तारखेच्या हल्लाबोल मोर्चाने भारतीय जनता पक्षाची झोप उडाली आहे. जनतेत असलेला संताप या मोर्चातून व्यक्त होत असल्याने लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मोर्चाच्या विरोधात आंदोलन काढण्याची नौटंकी भाजपा करत आहे.

महापुरुषांचा सातत्याने अपमान करणाऱ्या भाजपाच्या वाचाळविरांविरोधात मूग मिळून गप्प बसणारे आता मात्र महापुरुष व हिंदू देवतांच्या नावाखाली आंदोलन करत आहेत. हा प्रकार अत्यंत हास्यास्पद असून याला ‘चोराच्या उलट्या बोंबा’, असे म्हणतात, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

भाजपाचा समाचार घेताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सत्ताधारी लोकांची दादागिरी वाढली आहे. राजरोसपणे धमक्या देण्याचे प्रकारही वाढले आहेत. राज्यातील वातावरण बिघडवण्याचे काम केले जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी, मंत्री मंगलप्रभात लोढा, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार प्रसाद लाड यांनी महापुरुषांबद्दल काढलेले उद्गार हे महापुरुषांचा व त्यांच्या कार्याचा अपमान करणारेच होते, त्यात दुमत नाही.

पण भाजपाच्या एकाही नेत्यांने या वाचाळविरांवर कारवाई केली नाही व माफी मागण्याचे सौजन्यही दाखवले नाही. उलट या वाचाळविरांचा बचाव करण्यात आला. मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही महात्मा ज्योतीबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा उघडण्यासाठी भीक मागितली असे म्हणून त्यांचाही अपमान केला त्यावेळी भाजपा व आमदार आशिष शेलार कुठे होते? हा या महापुरुषांचा अपमान नाही का ? यावर भाजपाने माफी मागितली का?

मुंबईत उद्या १७ तारखेला महाविकास आघाडीचा हल्लाबोल मोर्चा हा अतिप्रचंड व भाजपाच्या बोलघेवड्यांची बोलती बंद करणारा असेल. भाजपाची जनतेत पत राहिलेली नाही, जनतेत प्रचंड असंतोष आहे म्हणून उरलेली पत राखण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपाचे आमदार आशिष शेलार करत आहेत. हिंदू देवदेवतांवर बोलण्याचा भाजपाला अधिकार नाही.

प्रभूरामाच्या नावावर ज्यांनी करोडो जनतेकडून पैसे घेऊन स्वतःचे खिशे भरले, अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या कार्यात जमीन घोटाळे करून पैसे खाल्ले, त्यांना देवदेवतांवर बोलण्याचा काय अधिकार? हिंदू भावनांचा केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी वापर करणाऱ्या भाजपाने देवदेंवतांवर बोलू नये. हिंदू देवदेवता व महापुरुषांवरचे भाजपाचे प्रेम बेगडी असून जनता सुज्ञ आहे, त्यांना खरे खोटे सर्व कळते, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: