मंडळ अध्यक्षाच्या निवडीवर कार्यकर्त्यांची सोशल मीडियातून नाराजी राजीनामे देण्याची भाषा…
भाजपची गडचिरोली जिल्हाची 106 जणांची जम्बो कार्यकारणी भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी नुकतीच घोषित केली असून या कार्यकारीणी मध्ये अनेक धक्कादायक बदल दिसुन येत आहे. माजी पालकमंत्री राजे अमरीशराव यांच्या निकटवर्ती यांचा अनेक ठिकाणी पत्ता कट झाला असून खासदार अशोक नेते यांचे निकटवर्तीय असलेल्या कार्यकर्त्यांचा जास्तीत जास्त भरणा हा कार्यकारणीवर दिसून येत आहे.
त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक ध्यानात ठेवून ही कार्यकारीणी घोषित तर करण्यात आलेली नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अहेरी उपविभाग हा जिल्ह्याच्या राजकीय घडामोडी चा केंद्रबिंदू असतो. जिल्ह्याचे राजकारण अहेरी राजनगरी ला दुर्लक्ष करून चालू शकत नाही.
भाजपच्या जम्बो कार्यकारीणी वर जास्तीत जास्त खासदार नेते यांच्या निकटवर्तीय व समर्थकांचा कसा वरचष्मा राहील या कडे विशेषतः लक्ष देण्यात आले आहे.मंडळ अध्यक्षच्या निवडीवर अहेरी उपविभागात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून नाराजीचा सूर कार्यकारिणी घोषित झाल्यावर व्यक्त केला आहे.काही अतिउत्साही कार्यकत्यांनी तर राजीनामे देण्याची भाषा वापरली आहे.
त्यामुळे ही कार्यकारीणी घोषित करताना अहेरी राजपरिवाराला पद्धतशीरपणे डावलल्याची चर्चा समर्थक कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. भाजप हा व्यक्तीकेंद्रीत पक्ष नसून कार्यकर्त्यांचा पक्ष आहे अचूक नियोजन , काटेकोर व्यवस्थापन ,सक्षम बूथरचना यामुळे भाजपची मोठी वाटचाल सुरू आहे.
मात्र ,ज्या ठिकाणी पक्ष व्यक्ति केंद्र झाला त्या ठिकाणी भाजपची मोठ्या प्रमाणात हानी, पीछेहाट झाली हे अनेक उदाहरणावरून आपण बघू शकतो. अहेरी विधानसभेचे प्रमुख माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांना कार्यकारणीतील पदांविषयी विश्वासात न घेता स्वतः निर्णय घेतले आहे.
त्यामुळे राजे साहेबांचे समर्थक आक्रमक भूमिका घेतल्याची चर्चा रंगू लागली आहे. येत्या काही दिवसात संपूर्ण विधानसभा क्षेत्रात मोठे शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अहेरी विधानसभा क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्ते राजे साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पर्यंत आपली नाराजी व्यक्त करून मोठा राजकीय कायापालट निर्णय घेतला जाऊ शकतो असे चित्र निर्माण झाले आहे.भाजपच्या सामान्य कार्यकत्याची ही लढाई कुठपर्यंत यशस्वी ठरेल या कडे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याची नजर लागली आहे.