Saturday, December 21, 2024
Homeराज्यन दुखावता डच्चू देण्याचा भाजपचा प्रयास… पण भारसाखळे आकोटवरच अडले… नवीन चेहऱ्याच्या...

न दुखावता डच्चू देण्याचा भाजपचा प्रयास… पण भारसाखळे आकोटवरच अडले… नवीन चेहऱ्याच्या आशंकेने स्थानिक भाजपाई अस्वस्थ…

आकोट – संजय आठवले

महाराष्ट्रात गुजराथ पॅटर्नचा अमल, ढासळते शरीर स्वास्थ्य, नेते, कार्यकर्त्यांची नाराजी, जनतेचा संताप, संघाची इतराजी, सर्वेचा प्रतिकूल अहवाल, भाकरी परतविण्याची शिफारस ह्या गोळा बेरजेनंतर आमदार प्रकाश भारसाखळे यांना न दुखावता आकोटमध्ये नवीन चेहरा देण्यावर भाजप श्रेष्ठींची खलबते सुरू झाली असून ही मोहीम फत्ते करण्याची कामगिरीही भाजप श्रेष्ठींनी काही जणांवर सोपविली आहे. या संदर्भात अल्पावधीतच निर्णय घेतला जाणार असून आकोट उमेदवारीच्या स्पर्धेतील जुन्या चेहऱ्यांमध्ये एका नवीन चेहऱ्याची भर पडणार असल्याची अटकळ लावली जात आहे. मात्र या अटकळीने आकोट मतदार संघाच्या भाजपा गोटात भूचाल येण्याची चिन्हे आहेत.

गट ४ ऑक्टोबर रोजी भाजपा निरीक्षक नितीन भुतडा आकोट मुक्कामी येऊन गेले. मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याच्या मोहिमेवर ते आले होते. कार्यकर्त्यांकडून प्राधान्य क्रमाने त्यांना तीन नावे हवी होती. त्यावेळी सवयीप्रमाणे आमदार भारसाखळे यांनी आपल्या खास १७२ निवडक लोकांची यादी आधीच निरीक्षकांना दिली होती. चर्चेकरीताही त्याच निवडक लोकांना आवतने धाडण्यात आली होती. त्यामुळे आमंत्रित लोकच कार्यक्रमस्थळी पोचले होते. परंतु काही कार्यकर्त्यांनी या व्यवस्थेवर आक्षेप नोंदविला. आणि चर्चेत सहभागी होण्याची संधी प्राप्त केली. या लोकांना आयोजकांकडून एक फॉर्म दिला गेला. त्यामध्ये त्यांच्या पसंतीची तीन नावे लिहावयाची होती.

ही सारी औपचारिकता पार पाडून निरीक्षक परत गेले. परंतु जाताना पाठीमागे चर्चेचे गुऱ्हाळ सोडून गेले. परिणामी आमदार भारसाखळे यांनी या ठिकाणी स्वमर्जीतील लोकच तेवढे बोलाविले, त्यांनी भारसाखळे यांचेच नावाला दुजोरा दिला, निरीक्षकांनाही भारसाखळे यांनी मॅनेज केले, त्यामुळे झाला प्रकार केवळ एक बतावणी होती अशा आशयाच्या चर्चा सुरू झाल्या. सोबतच केवळ १७२ लोक लक्षावधी मतदारांचे भविष्य ठरवतील काय? विशेषत: या लोकांमधील अनेकांना आपले पद आणि जबाबदारी ही ठाऊक नव्हती. अगदी वेळेवर त्यांना त्याची माहिती दिली गेली. असे लोक मतदार संघाचा उमेदवार ठरवू शकतील काय? असे प्रश्नही उपस्थित केले जाऊ लागले.

त्यानंतर हळूहळू या १७२ लोकांच्या प्राधान्य क्रमातील नावेही चर्चेत झिरपू लागली. त्यामध्ये ॲड. विशाल गणगणे, डॉ. राजेश नागमते, डॉ. रणजीत पाटील यांचीही नावे असल्याचे लक्षात आले. याच दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही एक सूक्ष्म सर्वे करण्यात आला. संघ परिवारातील अनुलोम नामक घटक दलाने हा सर्वे केला. यामध्ये अग्रस्थानी डॉ. रणजित पाटील यांचे नाव आणि ओबीसी चेहऱ्याकरिता ॲड. विशाल गणगणे यांचे नाव असल्याची सूत्रांनी माहिती दिली. ह्याच धामधुमीत डॉ. पाटील यांना वाशिम जिल्ह्यात प्रस्थापित करण्याचा प्रस्तावही विचाराधीन होता. परंतु तो प्रस्ताव त्यांचे पसंतीस उतरला नाही. त्यामुळे आहे त्याच पर्यायावर लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे अनुलोमनेही आकोटात भाकरी परतविण्याची शिफारस केलेली आहे.

परंतु असे होणे करिता आमदार भारसाखळे यांचा मोठा अडसर निर्माण झालेला आहे. सध्या त्यांची स्थिती “धरले तर चावते आणि सोडले तर पळते” अशी आहे. त्यामुळे त्यांचे वर सामनितीचा प्रयोग करावयाचा श्रेष्ठींचा मानस दिसत आहे. त्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस अग्रेसर झालेले आहेत. त्याकरिता नवनीत राणा हे आयुध फडणवीस यांनी उपसलेले आहे. राणा दांपत्याने भारसाखळे यांना भुरळ घालीत अचलपूर मतदार संघाची ऑफर दिली आहे. भारसाखळे यांनी नवनीत राणांना दर्यापुरात तर राणा दांपत्याने भारसाखळे यांना अचलपुरात सहकार्य करण्याचा हा प्रस्ताव आहे. भारसाखळे यांचा खर्च उचलण्याचे गाजरही राणा दांपत्याने भारसाकळे यांना दाखविले आहे.

अचलपुरात बच्चू कडूंची जिरविणारा मोहरा फडणवीस यांना हवाय. राणा दांम्पत्यही कडूंवर दात ओठ खाऊन आहे. त्यामुळे भारसाखळे अचलपुरातून लढले तर बच्चू कडूनाही तोडीस तोड उमेदवार दिला जाईल. इकडे आकोटात डॉ. रणजीत पाटील किंवा ॲड. विशाल गणगणे या दोन्ही फडणविस निकटवर्तीयांपैकी कुणा एकाची वर्णीही लावता येईल. फडणवीस यांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या राणाबाईनाही भारसाकळे यांचा हातभार लागेल. सोबतच फडणवीस यांना नकोश्या भारसाखळे यांचीही सोय होईल असा हा राणा फडणवीशी पाश भारसाखळे यांचे भोवती आवळण्याचा करेक्ट कार्यक्रम जोरात सुरू आहे. परंतु भारसाखळे यांचा वारू आकोटचा चारा सोडून अन्यत्र जाण्यास तयारच नाही.

अशा स्थितीत भारसाखळे यांना फडणवीशी हिसका देणे फारसे अवघड नाही. परंतु पुन्हा तेच “धरले तर चावते आणि सोडले तर पळते” ही भीती फडणवीसंना आहे. जादूगाराचा प्राण पोपटात असतो तसा भारसाखळे यांचा प्राण आमदारकीत आहे. त्याशिवाय ते जगूच शकत नाहीत. त्यामुळे फडणवीस यांनी आताच भासाखळे यांना मोकळे केले तर ते कुठेही आश्रय घेऊ शकतात. तसाही काहीच काळापूर्वी त्यांनी काँग्रेस व वंचितशी संपर्क साधलेला होता. आताही ते तो प्रयोग करू शकतात. हा भाग वेगळा कि, काँग्रेस त्यांना तोंडी लावणार नाही. पण वंचित मात्र अडचणीत असल्याने त्यांना कवटाळू शकते. काहीच सोय न झाल्यास भारसाखळे अपेक्षाही जोर लावू शकतात. तशी त्यांची रणनिती तयार आहे. परंतु हे फडणवीस यांना परवडणारे नाही. त्यामुळे आपले ईप्सित आस्ते आस्ते साधण्यावर फडणवीसांचा भर आहे.

हे सारे असे असतानाच दूर आसमंतातून अचानकपणे कानावर सुरेल गीताचे सूर पडावेत त्याच पद्धतीने प्रहार चे राज्य अध्यक्ष अनिल गावंडे यांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्या अधून मधून कानावर येत असतात. आताही त्यांनी दसऱ्याचा मुहूर्त साधून सिमोल्लंघनाचा निर्णय घेतल्याची आवई उठली आहे. परंतु जोवर आकोटची उमेदवारी कन्फर्म होत नाही, तोवर भाजपात प्रवेश न करण्याचा त्यांचा ठाम निर्धार आहे. आणि जुन्या जाणत्या भाजपाईंची नेमकी हीच ठसठसणारी जखम आहे. अनिल गावंडे केवळ निवडणुकीकरिता येत आहेत. पक्ष निर्माण अथवा बांधणी यामध्ये त्यांचे काडीचेही योगदान नाही. अशा स्थितीत पक्षाकरिता खस्ता खाणाऱ्यांनी अनिल गावंडे यांना केवळ सत्तेची फळे चाखविण्याकरिता कवटाळावे काय? हा मतदारसंघातील भाजप नेते, कार्यकर्त्यांचा मोठा प्रश्न आहे.

त्यामुळे अनिल गावंडे यांचा भाजप प्रवेश श्रेष्ठींची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. स्थिती अशी आहे कि, भारसाखळे यांना तिबार संधी दिल्यास कार्यकर्त्यांमध्ये आक्रोश ठरलेलाच आहे. पण अनिल गावंडे हे ऐन वेळेवर भाजपात आल्यास भडकाही निश्चित आहे. त्यामुळे भाजप श्रेष्ठी या संदर्भात अतिशय काळजीपूर्वक चिंतन करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा स्थितीत “उॅंट किस करवट बैठता है” हे पाहणे औत्सुक्याचे बनले आहे.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: