पत्रकारांचा अवमान करणा-या चंद्रशेखर बावनखुळे आणि भाजपने माफी मागावी…विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्राच्या समृद्ध संसदीय परंपरेला काळीमा लावू नये….
मुंबई, दि. २५ सप्टेंबर २०२३
२०१४ सालापासून देशात लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवून मनमानी पद्धतीने व हुकुमशाही वृत्तीने भाजपचे सरकार काम करत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून अनैतिक व असंविधानिक मार्गाने राज्याची सत्ता मिळवण्याचे पाप भाजपाने केले आहे. पत्रकारांना ढाब्यावर चहापाणी देऊन भाजपला अनैतिक मार्गाने सत्ता मिळवण्याचे व चालवण्याचे पाप झाकता येणार नाही, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांचा अवमान करणा-या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा निषेध करून त्यांनी राज्यातील पत्रकारांची माफी मागावी अशी मागणी केली. ते पुढे म्हणाले की, जे भाजपच्या पोटात आहे तेच बावनकुळेंच्या ओठावर आले आहे. अनैतिक मार्गाचा वापर करून सत्तेत यायचे आणि सत्तेत आल्यावर भ्रष्टाचार करून पैसा कमावयाचा व त्याच पैशाचा वापर करून अनैतिक मार्गाने पुन्हा सत्तेत यायचे हेच भाजपचे एक कलमी धोरण आहे. अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, मणिपूर, उत्तराखंड आणि महाराष्ट्रातही भाजपने अशाच प्रकारे सत्ता मिळवली.
शिवसेनेच्या आमदारांना सुरत आणि गुवाहाटीच्या हॉटेलात नेऊन खोके वाटून भाजपने महाविकास आघाडीचे सरकार पाडले आणि फुटीरांना सोबत घेऊन सत्ता मिळवली. असंविधानिक मार्गाने आलेले हे सरकार गेल्या एक वर्षापासून अनैतिक मार्गाने वाटचाल करत आहे. सगळीकडे भ्रष्टाचार बोकाळला आहे. गुन्हेगारी वाढली आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलीस स्टेशनच्या आवारात गोळीबार करत आहेत. आमदारांची मुले उद्योजकांचे अपहरण करून खंडण्या मागत आहेत. राज्यात जातीय दंगली घडवल्या जात आहेत. सरकारची ही पापं लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारी माध्यमे आणि पत्रकार जनतेसमोर मांडत आहेत. पत्रकारांनी या सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर उघडा पाडला आहे. भाजपच्या नेत्याचा नंगानाच जनतेसमोर उघड करणा-या लोकशाही वृत्तवाहिनीचे प्रक्षेपण सरकारने थांबवले, आरक्षणासाठी आंदोलन करणा-या मराठा बांधवाबद्दल सरकारच्या मनात काय आहे हे व्हिडीओमधून जनतेसमोर आणणा-या पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांचे ट्वीटर खाते बंद करण्यासाठी सरकारने ट्वीटरकडे तक्रार केली होती. एवढे उपद्व्याप करूनही आपली पापं झाकता येत नाहीत व पराभव निश्चित आहे, हे दिसत असल्यानेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आपल्या पदाधिका-यांना पत्रकारांना ढाब्यावर नेऊन चहापाणी देण्याची भाषा करत आहेत हे अत्यंत निंदनीय आहे.
महाराष्ट्राला पत्रकारितेचा मोठा समृद्ध वारसा आहे. लोकमान्य टिळकांसारख्या संपादकांनी इंग्रज सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा परखड सवाल आपल्या अग्रलेखातून जुलमी इंग्रज सरकारला करून जाब विचारला होता. आता चंद्रशेखर बावनकुळेंचे डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्न विचारण्याआधी बावनकुळेंनी पत्रकारांची माफी मागावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्राच्या समृद्ध संसदीय परंपरेला काळीमा लावू नये
विधानसभा अध्यक्षांनी आतापर्यंत फुटीर आमदारांच्या अपात्रेबाबत निर्णय घ्यायला पाहिजे होता. मा. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांचे कान टोचून त्यांना तातडीने सुनावणी घेऊन निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू हेच आहेत हे ही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. एकनाथ शिंदे यांनी प्रतोदपदी भरत गोगावलेंची केलेली नियुक्ती न्यायालयाने रद्द केलेली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य असेल असे प्रतिज्ञापत्र दिलेले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला तर महाराष्ट्राच्या समृद्ध संसदीय परंपरेला गालबोट लागेल आणि महाराष्ट्राची बदनामी होईल. त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी नियमानुसार तात्काळ निर्णय घ्यावा. कोणाच्यातरी दबावाखाली चालढकल करून महाराष्ट्राच्या समृद्ध संसदीय परंपरेला काळीमा लावू नये असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.