Sunday, December 22, 2024
Homeराज्यमुंबई | सत्तेच्या मस्तीमुळेच सरन्यायाधीशांवरही बोलण्याची भाजपा आमदाराची हिम्मत...

मुंबई | सत्तेच्या मस्तीमुळेच सरन्यायाधीशांवरही बोलण्याची भाजपा आमदाराची हिम्मत…

मणिपूरमध्ये महिला अत्याचाराच्या घटनेने भारताची जगात प्रतिमा डागाळली.

मुंबई – रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात दरड कोसळून इरसाळवाडी हे अख्खे गाव जगाच्या नकाशावरून गायब झाले आहे. मदत कार्य सुरु असले तरी त्याला मर्यादा येत आहेत. सरकारने ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे परंतु ही मदत अत्यंत तुटपुंजी असून मदत वाढवून दिली पाहिजे.

पुनर्वसन करताना एकट्या इरसालवाडीचे पुनर्वसन करुन चालणार नाही तर त्या भागातील धोकादायक सर्व गावांचे पुनर्वसन केले पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, इरसाळवाडी सारखी परिस्थिती कोकणात अनेक ठिकाणी आहे. पुनर्वसन करताना या सर्व भागाचाच विचार करावा लागणार आहे. पुनर्वसन करताना चांगल्या जागेत झाले पाहिजे. माधव गाडगीळ समितीच्या आधारावर पुनर्वसनाची व्यवस्था करावी.

निरपराध लोकांचा जीव जाणार नाही यासाठी अशा प्रकारच्या घटना भविष्यात पुन्हा होणार नाहीत याची खबरदारी घेण्याची गरज आहे. मुंबईच्या जवळ असलेल्या या गावात अजून रस्ताही झालेला नाही. मी स्वतः जाऊन या लोकांशी संवाद साधला. आताही या लोकांचे अश्रू थांबलेले नाहीत.

सरन्यायाधीशांवर टीका करण्याची हिम्मत…
मणिपूर तीन महिन्यापासून जळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका, फ्रान्सच्या दौऱ्यात व्यस्त होते तेथून देशात आले तर पक्षाचा प्रचार करण्यात मग्न राहिले. मणिपूरवर एक शब्दही त्यांनी काढला नाही. ७८ दिवसानंतर पंतप्रधान मोदींनी मौन सोडत, ‘कोणालाही सोडणार नाही’ असे विधान केले. एवढे बोलण्यास त्यांना तीन महिने लागले.

सुप्रीम कोर्टाने मणिपूर प्रकरणाची दखल घेत सरकारने कारवाई करावी अन्यथा कोर्ट कारवाई करेल असे म्हटले होते, त्यांची चिंता स्वाभाविकच आहे.

सरन्यायाधीशांच्या या भूमिकेवर राज्यातील भाजपाच्या एका आमदाराने टीका करत कोर्टालाच सुनावणारे ट्वीट केले आहे. सुप्रीम कोर्ट व सरन्यायाधीशांवर बोलण्याची या भाजपा आमदाराची हिम्मत ही सत्तेचा माज असल्याने झाली आहे. या प्रकरणी राज्यपाल व मा. सरन्यायाधीश यांना अवगत करु असे नाना पटोले म्हणाले.

भाजपाच्या राज्यात महिलेची विवस्त्र धिंड काढून बलात्कार केला ही हैवानियत आहे. या घटनेचा जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. देशाला कलंक लावण्याचे काम केले आहे. भारताच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचे हे कृत निंदनीय आहे. काँग्रेस पक्ष या घटनेचा निषेध करत आहे, असेही पटोले म्हणाले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: