आकोट – संजय आठवले
अकोला लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराबाबत कमालीची नाराजी उमटत असतानाच या उमेदवाराबाबत भाजप श्रेष्ठी नाराज असल्याचे दिसत असून या उमेदवारांकरिता आयोजित जाहीर सभा धडाधड रद्द करण्यात येत आहेत. त्यामुळे भाजपाच्या भरोशावर सतत दोन दशके अकोला मतदारसंघात अधिराज्य गाजविणाऱ्या धोत्रे आणि कंपू यांची गाडी उतरणीला लागली असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
तर भाजपात राहूनही तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणाऱ्या कार्यकर्त्यांना आता घराणेशाही आणि एकाधिकारशाही संपणार असल्याची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यामुळे निवडून आणण्याची गॅरंटी घेणाऱ्या सावरकर, भारसाखळे, पिंपळे, खंडेलवाल आणि मिटकरी या आमदारांची स्थिती अडकित्यात सापडलेल्या सुपारी सारखी झाली आहे.
काल परवा मराठा आरक्षणाच्या निमित्ताने राज्यातील वातावरण अगदी ढवळून निघाले होते. त्याचवेळी ओबीसी वर्गाने ही आपला आवाज बुलंद करून आपल्या अस्तित्वाची सज्जड जाणीव करून दिली. त्यामुळे राज्य सरकार चांगलेच अडचणीत आले. त्यातच लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले.
त्याच काळात घराणेशाही आणि नाकर्तेपणा यांना थारा देणार नसल्याच्या डरकाळ्या मोदी आणि शहा यांनी फोडल्या. त्यामुळे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांना त्यांचा नाकर्तेपणा भोवणार आणि घराणेशाहीच्या नकारघंटेमुळे यंदा अकोला मतदारसंघात ओबीसी चेहरा दिसणार अशी अटकळ अकोल्यात लावली जात होती. त्यामुळे माळी, कुणबी गोटात वसंत बहरु लागला होता. भाजपा श्रेष्ठींचाही तोच मनसुबा होता.
परंतु राजकीय सारीपाटावरील मोहरे हलविले गेले. आणि जनसमुहाच्या विरोधात जाऊन नाही नाही म्हणत भाजपाने विकास वैरी विद्यमान खासदार पुत्राचे गळ्यात वरमाळा घातली. हा खुद्द भाजपा मधील श्रेष्ठी, नेते व कार्यकर्ते यांना मोठा धक्का होता. या घटनेमुळे भाजपच्याच ओबीसी गोटात वसंत बहरण्यापूर्वीच पानगळ सुरू झाली.
नाराज आणि निराश भाजप नेते, कार्यकर्त्यांमध्येच पर्याय शोधला जाऊ लागला. गाव खेड्यातील सामान्य मतदारही चक्रावला. परिणामी ग्रामीण भागात थेट भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांनाच गेल्या दोन दशकातील विकासाचा लेखाजोखा मागितला जात आहे. बहुतांश ठिकाणी त्यांना निरुत्तरही व्हावे लागत आहे.
येथे उल्लेखनीय आहे कि, गेल्या दोन दशकात विद्यमान खासदारांनी काहीच केलेले नाही. आणि जे काही थोडे बहुत केले असेल त्याने नागरिकांना मनस्तापा खेरीज काहीही दिलेले नाही. परिणामी जनक क्षोभात भर पडत चालली आहे. केवळ मते घेतल्याखेरीज कोणत्याही कामाचा नसलेला लोकप्रतिनिधी म्हणून विद्यमान खासदारांकडे अंगुली निर्देश होत आहे. अशा स्थितीत भाजपने अंतर्गत सर्वे केल्याची खबर आहे.
मजेदार म्हणजे या सर्वे मध्ये विद्यमान खासदार हे नापासांच्या यादीतही अंतिम क्रमांकावर ढकलले गेले आहेत. ही स्थिती पाहून भाजप श्रेष्ठींचीही दातखिळी बसली आहे. विद्यमान खासदारांच्या वर्तनाने संघातही कमालीची नाराजी आहे. त्यामुळे फाटलेल्या आभाळाला कुठे कुठे थिगळे लावायची? असा प्रश्न आता भाजप श्रेष्ठींनाही पडलाय.
नेमकी तीच स्थिती अकोला मतदार संघात अनुप धोत्रे यांच्या गॅरेंटर दिग्गजांची झालेली आहे. लोकसभा तिकीट वाटपाचे वेळी आपापल्या क्षेत्राचे लोकप्रतिनिधी म्हणून या लोकांनी अनु धोत्रे यांची गॅरंटी घेतली होती. त्यामध्ये विद्यमान खासदारांचे भाचे विद्यमान आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाखळे, सतीश पिंपळे, रमेश खंडेलवाल आणि अजित पवारांचा बोलका बाहुला अमोल मिटकरी यांचा समावेश होता.
अजित पवारांचा ह्या बोलका बाहुला स्वतःच्या गावातच कवडीमोल किमतीचा असल्याने आणि चालत्या गाडीत बसण्याची त्याला हौस असल्याने त्याने अकोला लोकसभा मतदारसंघात तोंडच उघडलेले नाही. अजित पवारांची पायपुसणी म्हणून तो बारामतीच्याच परिसरात आपल्या जीवनाचे सार्थक करीत आहे. त्यामुळे तो मोठ्या धूर्तपणे अनुप धोत्रेंच्या गॅरंटी मधून सही सलामत सुटला आहे.
परंतु उर्वरित चौकडीला मात्र जनसामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे अनुप धोत्रेंच्या अनुषंगाने जनता ह्या गॅरेंटरांचीही झाडाझडती घेत आहे. त्यातच भाजपने मोठा घोर केला आहे. या निवडणुकीतील गुणपत्रिका निकट भविष्यात होणाऱ्या विधानसभा उमेदवार निवडीचे वेळी तपासल्या जाणार आहेत.
त्यात उत्तम गुण मिळविणाराच त्या तिकिटाकरिता पात्र ठरणार आहे. त्यामुळे लोकसभा परीक्षेत किमान प्रथम आणि कमाल मेरीट श्रेणीचे गुणांकन होणे अपरिहार्य आहे. परंतु वर्तमान स्थिती अशा गुणांकनाकरीता राजी नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे ‘बाप भीक मागू देईना अन् माय जेवू घाली ना’ अशी या चार आमदारांची स्थिती आहे.
अर्थात याकरिता ही मंडळी स्वतः जबाबदार आहे. विद्यमान खासदारांना वेठीस धरून मतदार संघाचा कायखपालट केला असता तर आता अशी हवा पालट झाली नसती. परंतु वेळ निघून गेल्यावर या जर तर च्या प्रश्नांना महत्त्व नसते. म्हणून आमदार भारसाखळे यांनी त्या फंदात न पडता अनुप धोत्रे नापास म्हणजे आपण नापास हे गृहित धरले आहे. त्यामुळे अनुप धोत्रेच्या निमित्याने त्यांची शाळाबाह्य विद्यार्थी अर्थात अपक्ष लढण्याची तयारी चालली आहे.
अशा स्थितीत पक्षांतर्गत सर्वेमुळे भाजप स्टार प्रचारकांनीही सावध भूमिका घेतली आहे. अनुप धोत्रेंच्या प्रचाराला आपण गेल्यावरही स्थिती सावरू शकत नाही, हा अंदाज त्यांना आलेला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक २१ एप्रिल रोजी मुर्तीजापुर येथील आणि दिनांक २२ एप्रिल रोजी आकोट येथे होणारी सभा रद्द केली. दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांची अकोला येथे दिनांक २१ एप्रिल ची सभा रद्द केली.
आता २४ एप्रिल रोजी अमित शहा यांची सभा ठरलेली आहे. परंतु विद्यमान खासदारांची सांगताना न येणारी कामे, घराणेशाहीला विरोध दर्शवूनही विद्यमान खासदारांच्या घरातच दिलेली उमेदवारी या प्रश्नांची उत्तरे अन्य प्रश्नांसोबतच जनतेला द्यावी लागणार असल्याने ही सभाही रद्द होण्याचीच अधिक संभावना दिसत आहे. एकूण अकोला लोकसभा मतदारसंघाचा सार शोधला असता जनतेसोबतच भाजप-श्रेष्ठींनीहीन अनुप धोत्रे यांचेकडे पाठ फिरविली असल्याचे दिसत आहे.