अकोला – अमोल साबळे
अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ.रणजीत पाटील पराभूत का झाले आहे.प्रदेश भाजपने त्यासाठी अहवाल मागवला आहे. पाटील यांच्या पराभवामुळे भाजपला मोठा धक्का बसला होता, पाटील पराभूत झालेच कसे असा प्रश्न आता प्रदेश भाजप तसेच दिल्लीला देखील सतावत आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आता प्रदेश भाजपाचे उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांची एक सदस्य चौकशी समिती नेमण्यात आली आहे, कर्जतकर यांना पंधरा दिवसाच्या आत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
निवडणुकीशी संबंधित विविध घटकांची चर्चा करून आपण अहवाल तयार करा असे त्यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे. कर्जतकर हे पुढील आठवड्यात बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात दौरा करतील आणि पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आमदार खासदार यांच्याशी चर्चा करतील. शिवाय संघ परिवारातील शिक्षण क्षेत्राशी संबंधित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशीही ते चर्चा करतील अशी शक्यता आहे.
कर्जतकर हे गेले चार दशके भाजपमध्ये सक्रिय आहेत आणि विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. जिल्ह्याजिल्ह्यातील राजकीय समीकरणे, सामाजिक समीकरणे यांची खडा न खडा माहिती असलेले अनुभवी पदाधिकारी म्हणून कर्जतकर यांची ओळख आहे.
जुनी पेन्शन योजना, भाजप अंतर्गत नाराजी, रणजीत पाटील यांच्या उमेदवारीबद्दल असलेली नाराजी, प्रचार यंत्रणेतील समन्वयाचा अभाव, संघ परिवाराची नाराजी पराभवाची अनेक कारणे सांगितली जातात तथापि कर्जतकर यांच्या हवालात आता काय समोर येते आणि त्यावर पक्ष कुठली कारवाई करणार याबाबत उत्सुकता आहे.