आकोट – संजय आठवले
अकोला जिल्हा भाजप अध्यक्षांनी केलेल्या हकालपट्टीचे संबंधित कार्यकर्त्यांमधून तीव्र पडसाद उमटणे सुरू झाले असून आकोट तालुका अध्यक्ष तथा शहराध्यक्ष यांनी सात दिवसात जाहीर माफी न मागितल्यास त्यांचे घरावर शेकडो महिलांचा निषेध मोर्चा काढणार असल्याचा इशारा निलंबित कु. चंचल पितांबर वाले यांनी दिला आहे.
त्याने घाबरगुंडी उडाल्याने संबंधितांनी पितांबरवाले यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यातच सहकार नेते नानासाहेब हिंगणकर यांचे अमृत महोत्सव सोहळ्यात चंचल पितांबरवाले ह्या आमदार भारसाखळे यांना काळे फासणार असल्याचे वृत्ताने पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे.
परंतु “नानांशी माझा घरोबा असून त्यांचे सोहळ्यात आपण विघ्न आणणार नाही” असा खुलासा पितंबरवाले यांनी केल्याने पोलीस प्रशासनाचा जीव भांड्यात पडला आहे.
अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी दि.२९.१२.२०२४ रोजी आकोट शहरातील ११ कार्यकर्त्यांना पक्षातून निलंबित केले होते. त्या संदर्भातील पत्रामध्ये ही कारवाई आकोट तालुका अध्यक्ष राजेश रावणकार, शहराध्यक्ष हरीष टावरी यांचे अहवालाचे आधारे केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे हे दोन्ही अध्यक्ष आमदार भारसाकळे यांचे निकटवर्ती असल्याने या हकालपट्टी मागे आमदार भारसाकळे हेच मुख्य सूत्रधार असल्याचे सूर्यप्रकाशाईतके स्पष्ट झाले आहे. त्यामुळे निलंबित ११ जणांच्या नजरा रावणकार व टावरी यांचेवर रोखल्या गेल्या आहेत.
त्यातच महत्वाचे म्हणजे कु. चंचल पितांबरवाले यांनी आपल्या पदांचे राजीनामे फडणवीस व बावनकुळे यांना मतदानापूर्वीच पाठविले होते. त्यामुळे या निलंबन यादीत आपले नाव पाहून पितांबरवाले यांनी चंडिका अवतार धारण करून आकांड तांडव सुरू केले. ह्या कृत्याकरिता त्यांनी रावणकार व टावरी यांना पूर्णपणे टार्गेट केले.
अकारण आपले नाव या निलंबनात जोडून या दोन अध्यक्षांनी आपला अपमान व मानहानी केल्याचा मुद्दा त्यांनी लावून धरला. या मुद्द्याची भाजपामध्ये वरपर्यंत चर्चा होऊ लागली आहे. त्या चर्चेने या दोन्ही अध्यक्षांसहित प्रदेश सचिव रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे, प्रकाश भारसाकळे यांना जबर हादरे बसणे सुरू झाले आहे.
या हादऱ्यांचे तडे बुजविणेकरिता दोन्ही अध्यक्ष तथा त्यांच्या समर्थकांनी २ जानेवारी रोजी दिवसभर चंचल पितांबरवाले यांची मनधरणी केली आहे. परंतु त्याचा काहीही परिणाम न होता उलट पितांबरवाले यांनी ७ जानेवारी पर्यंत दोन्ही अध्यक्षांना माफी मागायचे आवाहन केले आहे. तसे न झाल्यास दोन्ही अध्यक्षांचे घरावर महिलांचा थाळी बजाव निषेध मोर्चा काढण्याचा इशाराही पितांबरवाले यांनी दिला आहे.
एकीकडे हा घटनाक्रम वेगाने सुरू असताना अगदी मोदी, शहा, फडणवीस यांचे कावेबाजीची नक्कल करीत भारसाखळे आणि त्यांच्या ताटाखालील मांजरांनी पितांबरवाले प्रकरणात अतिशय धूर्ततेने पोलिसांची एन्ट्री करविली आहे. ती अशी की दि.३ जानेवारी रोजी सहकार नेते नानासाहेब हिंगणकर यांचा अमृत महोत्सव आहे. त्याकरिता आमदार भारसाखळे हजर राहणार आहेत. त्या सोहळ्यात चंचल पितांबरवाले त्यांचे तोंडाला काळे फासणार आहे.
अशा आशयाचे वृत्त जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कानी घातले गेले. त्यावर त्यांनी आकोट पोलिसांना सतर्क करून योग्य कारवाई करण्याचा आदेश दिला. हिंगणकर यांचा सोहळा संपेपर्यंत पितांबरवाले यांना नजर कैदेत ठेवायचे आणि आपल्या बळाची कल्पना देऊन त्यांना घाबरवायचे हा डाव यामागे होता.
त्यानुसार पोलिसांनी पितांबरवाले यांचेशी संपर्क साधून त्यांना असा प्रकार न करणेबाबत समजपत्र दिले. तेव्हा “सहकार नेते नानासाहेबांशी माझा घरोबा आहे त्यामुळे त्यांची सोहळ्यात विघ्न आणण्याचा मी विचारही मनात आणू शकत नाही” असे उत्तर पितांबरवाले यांनी पोलीसांना दिले. या उत्तराने पोलिसांचे समाधान झाले. परंतु हा डाव रचणाऱ्या आमदारांच्या खुशमस्कर्यांचे यांचे चेहरे मात्र पडले.
त्यानंतर पितांबरवाले यांचे इशाऱ्याबाबत आमदार भारसाखळे आणि त्यांचे ताटाखालील मांजरांची बैठक झाली. त्यामध्ये केवळ बोलण्यातच पटाईत असलेल्या एक-दोन पोपटांनी या इशाऱ्याला न भिण्याचा निर्धार व्यक्त करीत उलट छत्रपती शिवाजी महाराज चौकात चंचल पितांबरवाले यांनाच माफी मागायला लावू. अशा बायकी वल्गना केल्या.
सोबतच महिलांच्या निषेध मोर्चाचा सामना करणेकरिता आपल्या पाठीशीही पहिलवान असल्याचा दावा करून महिलांप्रती आपल्या अनादराच्या गलिच्छ भावना ही प्रदर्शित केल्या. परंतु हा प्रकार न पटल्याने या बैठकीतील काही लोकांनी ही चर्चा बाहेर आणली आहे. जी कर्णोपकर्णी होणे सुरू झाले आहे. त्यामुळे एका महिलेचा अपमान करून तिची माफी मागण्याऐवजी तिला व तिच्या सहकारी महिलांबाबत अनुदार उद्गार काढणाऱ्या या भाजप नितीबाबत जनमानसात चीड व्यक्त केल्या जात आहे.