Monday, December 23, 2024
HomeदेशBiparjoy Cyclone | चक्रीवादळाची गुजरातकडे वाटचाल...रेल्वे गाड्याही रद्द...आतापर्यंत काय घडले ते जाणून...

Biparjoy Cyclone | चक्रीवादळाची गुजरातकडे वाटचाल…रेल्वे गाड्याही रद्द…आतापर्यंत काय घडले ते जाणून घ्या…

Biparjoy Cyclone – चक्रीवादळ बिपरजॉय हळूहळू गुजरातच्या किनारपट्टीवर पोहोचत आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानीची भीती लक्षात घेता किनारी भागातून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. डझनभर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला असून मच्छिमारांना समुद्रात जाण्यापासून रोखण्यात आले आहे.

वादळामुळे कोणाचीही जीवितहानी होऊ नये म्हणून भारताव्यतिरिक्त पाकिस्तानमधील किनारपट्टी भागातूनही हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा करून गुजरातची स्थिती जाणून घेतली आहे.

15 जूनला म्हणजेच गुरुवारी बिपरजॉय वादळ किनारपट्टीवर पोहोचेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. यादरम्यान, किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाने मोठा विध्वंस होऊ शकतो.

या पार्श्वभूमीवर एनडीआरएफसह सर्व विभागांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. कच्छ, सौराष्ट्र, गुजरातमधील द्वारका आणि पाकिस्तानच्या काही भागात यामुळे सर्वाधिक नुकसान होऊ शकते.

6 जून रोजी अरबी समुद्रातून उठलेले हे वादळ आधी कराचीच्या दिशेने सरकले होते, त्यानंतर भारतात कमी नुकसान होण्याची शक्यता होती. आता त्याचा मार्ग बदलला आहे आणि गुजरातकडे वाटचाल सुरू आहे.

15 जून रोजी जेव्हा ते गुजरातच्या किनारपट्टीवर धडकेल तेव्हा त्याचा वेग ताशी 150 किलोमीटर असेल. अशा स्थितीत किनारी भागात भयंकर विध्वंस होऊ शकतो.

बिपरजॉयचा वेग आणि त्यामुळे होणारे नुकसान पाहता रेल्वेही अलर्ट मोडमध्ये आहे. अनेक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून किनारी भागात धावणाऱ्या ६७ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

याचा सर्वाधिक परिणाम पश्चिम रेल्वेवर होणार असून, अशा स्थितीत किमान १५ जूनपर्यंत पश्चिम रेल्वेच्या सेवेवर परिणाम होणार आहे. याशिवाय डझनहून अधिक उड्डाणेही रद्द करण्यात आली आहेत.

बिपरजॉय वादळ किनारपट्टीवर पोहोचण्यापूर्वीच गुजरात आणि मुंबईच्या किनारपट्टीच्या समुद्रात उंच लाटा उसळत आहेत. याशिवाय राजस्थानपर्यंत अनेक भागात पाऊस होताना दिसत आहे. गुजरात, गोवा, महाराष्ट्र ते राजस्थानपर्यंत मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

वादळाच्या वाढत्या वेगासोबतच सरकार आणि प्रशासनही सज्ज झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: संबंधित विभागांची उच्चस्तरीय बैठक घेतली आहे.

ते गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याही सतत संपर्कात आहेत. पीएमओने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अधिकाऱ्यांना संवेदनशील भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आणि त्यांच्यासाठी व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

वादळाचा धोका लक्षात घेता एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे. यासाठी गांधीधामचा हेल्पलाइन क्रमांक 02836-239002 आणि भुज रेल्वे स्थानकाचा हेल्पलाइन क्रमांक 9724093831 जारी करण्यात आला आहे.

गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये शाळाही बंद करण्यात आल्या आहेत. एनडीआरएफ व्यतिरिक्त लष्कर, नौदल आणि तटरक्षक दलांनाही अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: