मुंबई – गणेश तळेकर
शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक तथा माजी आ. स्व.विनायक मेटे यांचे लहान भाऊ रामहरी मेटे यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांसह शिवसंग्राम संघटनेतून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला.
मराठा समाजाचा बुलंद आवाज…जवळपास चार दशकापासून मराठा महासंघ ते शिवसंग्राम पर्यंतचा प्रवास….केवळ आणि केवळ मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी,आरक्षणासाठी व बहुजन समाजाच्या कल्याणासाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे विधानपरिषदेत मराठा व बहुजन समाजाचा आवाज बुलंद करत सत्ताधाऱ्यांवर तुटून पडणारे…
शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारक समितीचे अध्यक्ष,स्व.विनायक मेटे यांचे अपघाती दुर्दैवी निधन झाले.त्यांच्या अचानक जाण्याने मराठा व बहुजन समाजाचे मोठे नुकसान झाले.
स्व. विनायक मेटे यांचे लहान भाऊ रामहरी मेटे हे शिवसंग्राम संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. विनायक मेटे यांच्या अकस्मात मृत्यूनंतर, संघटनेचे नेतृत्व कोण करणार यावर अंतर्गत धुसफुस सुरू होती.
डॉ. ज्योती मेटे यांनी संघटनेचे अध्यक्ष पद स्वीकारून नेतृत्व करावं असा विचार पुढे आला. हळूहळू संघटनेच्या नेतृत्वावरून वादविवाद होऊ लागले. रामहरी मेटे यांची संघटनेत होत असलेली घुसमट यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा देऊन काही काळ दूर राहण्याचा निर्णय घेतला.
रामहरी मेटे नाराज असल्याची राज्यभर चर्चा सुरू होती. परंतु शिवसंग्राम संघटनेचे कार्य गेली दोन वर्ष होत नसल्याने तसेच संघटनेतील नेते राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात समन्वय न साधता परस्पर निर्णय घेत असल्याची खदखद रामहरींनी अनेकदा व्यक्त केली होती.
संघटनेच्या भविष्यासाठी हे धोकादायक आहे म्हणून राज्यातील पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून त्यांनी शिवसंग्राम संघटनेतून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला. जय शिवसंग्राम या नवीन संघटनेच्या स्थापनेची घोषणा आज रायगडावर राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत करण्यात आली.
जय शिवसंग्राम या नवीन संघटनेची स्थापना करून स्वर्गीय विनायक मेटे च्या जाज्वल्य विचाराशी प्रामाणिक राहून सामाजिक कार्य करणार असल्याचे रामहरी मेटे यांनी सांगितले. रामहरी मेटे यांच्या निर्णयामुळे शिवसंग्राम संघटनेला मोठा धक्का बसला आहे.