Saturday, December 21, 2024
Homeराज्यवन अधिकाऱ्यांची मोठी कारवाई…पणज येथील महालक्ष्मी फर्निचर मार्टवर छापा…शिसम सह लाखोंचे सागवान...

वन अधिकाऱ्यांची मोठी कारवाई…पणज येथील महालक्ष्मी फर्निचर मार्टवर छापा…शिसम सह लाखोंचे सागवान जप्त….आकोट वनपाल संशयाचे वर्तुळात…

आकोट- संजय आठवले

आकोट तालुक्यात सातत्याने प्रतिबंधित तथा अन्य वृक्षांची कटाई आणि त्यांची विल्हेवाट लावण्याचे प्रकार होत आहेत. वनाच्या प्रतिबंधित क्षेत्रातून सागवान, शिसम या जातीच्या लाकडांची तस्करी होत आहे. त्यावर नियंत्रण ठेवणेकरिता लाकडांवर प्रक्रिया करणार्‍या सर्व ठिकाणांची वारंवार तपासणी होणे अपेक्षित आहे. परंतु काटेकोरपणे हे कर्तव्य केल्या जात नसल्याने आकोट परिसरात वृक्ष कटाई आणि लाकूड प्रक्रिया हे दोन्ही व्यवसाय धडाक्यात सुरू आहेत.

अशातच आकोट तालुक्यातील मार्डी या आदिवासी गावातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित लाकडाची तस्करी होत असल्याचे वनविभागाचे निदर्शनास आलेले आहे. दिनांक १४ नोव्हेंबर रोजी मार्डी येथून सागवान लाकडाची वाहतूक करणारे वाहन येवदा पोलीस स्टेशन अंतर्गत वडनेर गंगाई गावानजिक पकडण्यात आले. हे सागवान अंजनगाव परिक्षेत्रातील पांढरा खडक वर्तुळातील ढोरबा बीटच्या चिलाटी बिल्ला वन खंड क्रमांक १०१५ व १०२५ मधून आणले जात असल्याचा वनाधिकाऱ्यांना संशय आहे.

ह्याच संशयावरून वनविभागाने चौकशी सुरू केली. त्यामध्ये मार्डी येथून ज्या ज्या ठिकाणी सागवान तस्करी होत असल्याचा संशय आहे, अशा ठिकाणांची माहिती घेऊन वनाधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली. त्यामध्ये पणज येथील सुरेश दातीर यांच्या महालक्ष्मी फर्निचर मार्टमध्ये लाकडाचा मोठा साठा असल्याची खबर मिळाल्याने वन अधिकाऱ्यांनी तिकडे लक्ष केंद्रित केले. त्यानुसार आर. एस. कुमार स्वामी, एस. आर. भावसे उपवनसंरक्षक अकोला, सुरेश वडोदे सहाय्यक वनसंरक्षक अकोला, व्ही.आर. थोरात वनपरिक्षेत्र अधिकारी अकोला, किरण पाटील विभागीय वनाधिकारी दक्षता अमरावती, प्रशांत भुजाडे वनक्षेत्र अधिकारी फिरते पथक अमरावती, के.डी. पडोळ वनपरिक्षेत्र अधिकारी संरक्षण बुलढाणा, सुरेंद्र सुनील राऊत वनपाल आकोट, विजय गुलेरीकर वनपाल अंजनगाव यांनी दिनांक १७ नोव्हेंबर रोजी या ठिकाणी छापा घातला.

सारा गाव झोपेत असतानाच वन अधिकाऱ्यांचा हा फौज फाटा भल्या पहाटे घटनास्थळी दाखल झाला. काही वन कर्मचाऱ्यांनी फर्निचर मार्टच्या कुंपणावरून आवारात उड्या मारल्या. तर काही लोकांनी मागील बाजूने आत मध्ये घुसण्याचा प्रयास केला. ही खबर फर्निचर मार्ट संचालक सुरेश दातीर यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी हजर होऊन प्रवेशद्वार उघडले. त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी फर्निचर मार्टची कसून तपासणी केली. त्यावेळी वनाधिकाऱ्यांचे म्हणण्यानुसार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रक्रिया केलेले अवैध शिसम व सागवान आढळून आले.

ही कार्यवाही सुरू असतानाच दुपारी २ वाजता वन अधिकारी भोजना करता निघून गेले. त्यामुळे काही काळ कार्यवाही संपल्याची सर्वांची धारणा झाली. परंतु ४ वाजता वन अधिकारी पुन्हा घटनास्थळावर धडकले. काहीही न सांगता त्यांनी उर्वरित लाकूड वाहनात भरण्यास सुरुवात केली. त्यावर सुरेश दातीर यांनी आक्षेप घेतला.

आणि नेण्यात येणाऱ्या लाकडाची नोंद घेण्याची मागणी केली. यावेळी घटनास्थळी मोठा जमाव गोळा झाला. त्यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले. अखेर त्या वाहनातून लाकडे बाहेर काढण्यात आली आणि काटेकोर नोंद घेऊन ही लाकडे जप्त करण्यात आली.

या धामधुमीत आपल्या वर्तनाने वादग्रस्त ठरलेले आकोट वनपाल सुनील राऊत यांचा वावर मात्र संभ्रम निर्माण करणारा होता. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हा छापा पडण्याच्या आधीच्या रात्री अदमासे दोन तास पर्यंत सुनिल राऊत घटनास्थळी सुरेश दातीर यांचे सोबत होते. दुसरे म्हणजे फर्निचर मार्ट मधून काढलेल्या लाकडांनी वाहन पूर्ण भरल्यावर निघून जातेवेळी राऊत लघुशंकेच्या बहाण्याने फर्निचर मार्टच्या पिछाडीस गेले आणि लगेच दोन क्षणातच संबंधीतांकडून भरलेले वाहन रोखण्यात आले.

यावरून हा निव्वळ योगायोग कि, खाल्लेल्या मिठाला जागून राऊतांचा दोन्ही बाजू सांभाळण्याचा प्रयोग? असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न निर्माण होण्यास मोठे कारण आहे. ते म्हणजे, राऊत आकोट वनपाल आहेत असे म्हणण्यापुरतेच ते कार्यालयात असतात. क्वचित प्रसंगी ते दौऱ्यावर जातात. बाकी सारा वेळ आकोट शहरातील आरा मशीन्सवर घालवितात. अधिकात अधिक कामे वनरक्षक तिरुखबाई आणि त्यांचा मदतनीस हेच पार पाडतात.

येथे उल्लेखनीय आहे कि, वनपाल सुनील राऊत यांचे मूर्तिजापूर येथून आकोट येथे त्यांचे विनंतीवरून स्थानांतरण करण्यात आले आहे. त्यामुळे इच्छित स्थळ प्राप्त झाल्याने त्यांचेकडून चोख कामकाज होणे अपेक्षित आहे. मात्र आकोट तालुक्यात होणारी प्रचंड वृक्षतोड, त्यावर न होणारी कार्यवाही आणि राऊतांची आरा मशीन्सवरील बैठक पाहू जाता उंटावरून शेळ्या हाकणारी त्यांची कार्यशैली चटकन ध्यानात येते. त्यांच्या कार्यशैलीचे किस्से अल्पावधीतच महाव्हाईसच्या वाचकांना वाचावयास मिळणार आहेत. तूर्तास महालक्ष्मी फर्निचर मार्टवरील कार्यवाहीतून नेमके काय बाहेर पडते याकडे महाव्हाईस नजर ठेवून आहे.

याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वन अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या लाकूड फाट्याच्या नोंदी घेतलेल्या आहेत. यामध्ये शिसम चे लाकूड असल्याचेही सांगण्यात आले. परंतु शिसम चे लाकूड किती? आणि सागवान लाकूड किती? त्यांची बाजारभावानुसार किंमत काय? आरोपी किती आहेत? त्यांची नावे काय? याबाबतीत चौकशी अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात मोठे गुढ निर्माण झालेले आहे.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: