साकोली तालुक्यात “भेल” चे वातावरण तापले…
भंडारा – सुरेश शेंडे
साकोली जिल्ह्यातील अनेक युवा बेरोजगारांचे स्वप्न असलेली “भेल पिप” १२ वर्षांपासून निद्रिस्त व अपूर्ण अवस्थेत आहे. याबाबद येथील भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना वारंवार प्रशासनाला उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याची परवानगी मागत आहेत. पण शासन याकडे जाणीवपुर्वक दूर्लक्ष करीत आहे. यातच मुलांच्या बेरोजगारीला कंटाळून एका आदिवासी शेतकऱ्याने किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या संतापजनक प्रकाराने साकोली तालुक्यासह जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या शेतकऱ्यावर भंडारा येथे उपचार सुरू झाले आहे.
साकोली जवळील मुंडीपार/सडक येथे १२ वर्षांपासून भेल कंपनी अपूर्ण व मुर्दाड अवस्थेत असून वारंवार मुंडीपार/सडक,बाम्हणी येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना विविध आंदोलने व उपोषणे करून थकलीत. नुकतेच प्रशासनाने भेल प्रकल्पग्रस्त समितीच्या उपोषणाची परवानगी नाकारली.५ जुलैला येथे उपोषणाला बसण्याचा निर्णय समितीने घेतला होता.
मात्र २९ जुनला सायं. ७ वा. दरम्यान मुलांची वाढत चाललेले वय व बेरोजगारीला कंटाळून बाम्हणी येथील भेल प्रकल्प ग्रस्त शेतकरी शंकर कंगाले(वय ५४ वर्ष) यांनी घरी काहीही न सांगता विषारी किटकनाशक प्राशान केले. हि माहिती वाऱ्यासारखी पसरली.माहिती कळताच भेल प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष विजय नवखरे व सहका-यांनी या शेतकऱ्यास साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.परंतू प्रकृती चिंताजनक असल्याने भंडारा येथील खासगी रूग्णालयात भरती केले आहे.
प्रकल्पग्रस्त शेतकरी शंकर कंगाले यांची शेतजमीन भेल प्रकल्पात गेली व हा प्रकल्प १२ वर्षा पासुन बंद असल्याने शेतकऱ्यास नैराश्य आले.त्यांना दोन मुले आहेत.एक मुलगा बेरोजगार असून वडील व मुलगा मोलमजुरी करून प्रपंच चालवितात.मुलाचे वाढते वय व दिवसेंदिवस वाईट होत चाललेली आर्थिक स्थिती या विवंचनेतून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.सध्या शंकर कंगाले यांची प्रकृती चिंताजनक आहे.
परंतु लोकप्रतिनिधी कुंभकर्णी झोपेत असल्यामुळे भेल प्रकल्पग्रस्त आणी युवा बेरोजगार यांची मानसिकता दिवसेंदिवस खचत आहे. आतातरी शासनाने याची गंभीरतेने दखल घेऊन एकतर भेल कंपनीबाबद ठोस पाऊल उचलावे अथवा शेतकऱ्यांना त्या जागेवर शेती तरी करू द्यावी असा पवित्रा घेतला आहे.अन्यथा हे आंदोलन साकोलीसह भंडारा जिल्ह्यात उग्र रूप धारण करेल असाही इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
“भेल प्रकल्पात आमची चांगल्या उत्पन्नाची जमिन गेली. हा प्रकल्प सुरू न झाल्याने आम्ही बेरोजगार झालो. प्रशासनाने सांगितले होते की,तुमचा एक मुलाला भेल कंपनीत नोकरी देऊ.याचाच मानसिक ताण माझ्या वडीलांनी घेतला व विष प्राशन केले.अखेर कुठपर्यंत आम्हाला शासन ताटकळत ठेवणार आहेत”
मुकेश कंगाले, रा.बाम्हणी (विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा मुलगा)
“ही फार दूर्देवी घटना आहे. भेल कंपनीबाबद शासन कित्येक वर्षांपासून भुलथापा देत आहेत. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाला उपोषणाचा इशारा दिला होता.पिडीत शासनापुढे आपली प्रतिक्रियाही मांडू शकत नाही काय?शासनाने या भेल कंपनीच्या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष दिले पाहिजे”
डॉ.सोमदत्त करंजेकर, सामाजिक कार्यकर्ता, साकोली
“आमच्या युवा बेरोजगारांना नोकरीच्या संदर्भात व शेतकऱ्यांच्या हितासाठी या आंदोलनाची दखल कुणीच घेत नाही.आता मात्र या आदिवासी शेतकऱ्याने किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. आता तरी शासन जागृत होईल काय?अन्यथा आम्हाला जिल्हाभर आंदोलन करावे लागणार. दिवसेंदिवस वाढती बेरोजगारी बघता युवा व्यसनाच्या आहारी जाऊन मृत्यूला आमंत्रण देत आहेत.शासनाने याची गंभीरतेने दखल घ्यावी अन्यथा येणाऱ्या दिवसात रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल” विजय नवखरे, अध्यक्ष भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना मुंडीपार/सडक.