तेल्हारा – गोपाल विरघट
सप्तखंजेरी प्रबोधनकार संघ (महाराष्ट्र राज्य),गुरुदेव सेवा मंडळ तसेच विविध सामाजिक संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सप्तखंजेरी निर्माते प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा जन्मदिवस १६ मे “प्रबोधन दिन” म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रम यावर्षी कीर्तनकार पंकजपाल महाराज यांच्या मुख्य आयोजनात माणुसकीची भिंत संघटना पुसद यांच्या विशेष सहकार्याने यवतमाळ जिल्ह्यातील स्व.सुधाकरराव नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय,पुसद येथे आयोजित करण्यात आला होता.
महाराष्ट्र राज्य सप्तखंजेरी प्रबोधनकार संघाच्या वतीने या दिनाचे औचित्य साधून देण्यात येणारा “सत्यपाल महाराज समाजसेवा पुरस्कार” द्वितीय वर्ष यावर्षी आदर्श ग्राम पाटोदा चे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पुरस्काराचे स्वरूप गौरवचिन्ह व ३१,००० हजार रु.रोख असे होते पुरस्कार स्वीकारल्यावर पेरे पाटील यांनी सदर प्राप्त पुरस्काराच्या रक्कमेतून दरवर्षी १६ मे प्रबोधन दिनाला पाटोदा जिल्हा संभाजीनगर या गावातील निराधार व वृद्ध मंडळींना अन्नदान करण्याचा निर्धार यावेळी केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार इंद्रनील नाईक,व्यसनमुक्ती सम्राट मधुकर खोडे महाराज,सत्यशोधक विचारवंत डॉ.सैय्यद साहेब,संभाजी ब्रिगेड चे प्रदेश अध्यक्ष मनोज आखरे,अभ्यासक नितीन सरदार,शिव व्याख्याते प्रेम बोके,राष्ट्रसंत विचार प्रचारक ज्ञानेश्वर रक्षक,
अध्यात्म गुरुकुल गुरुकुंज मोझरी चे संचालक रवी मानव,सप्तखंजेरी वादक संदीपपाल महाराज,डॉ.रामेश्वर बरगड,भिम टायगर सेनेचे दादासाहेब शेळके,गजानन चिंचोळकर इ.मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर दिनी नियोजनानुसार दिवसभर विविध सामाजिक कार्यक्रम उपक्रम आयोजित करण्यात आले त्यामध्ये मुख्य सोहळ्यात सत्यपाल महाराजांची बीज तुला करण्यात आली.यासोबत महाराष्ट्रातुन आलेल्या सप्तखंजेरी कीर्तनकारांचे कार्यकर्ता चिंतन शिबीर देखील यावेळी आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंकजपाल महाराज सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन किशोर बळी यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी माणुसकीची भिंत संघटना,वैश्विक विकास संघटना मुळावा,सप्तखंजेरी वादक प्रबोधनकार संघ (महाराष्ट्र राज्य) यांनी अथक परिश्रम घेतले.