Sunday, December 22, 2024
Homeराज्यहिवरखेड नगरपरिषद निर्माणात भारसाखळे यांचाच खोडा…ग्रामस्थांमध्ये संतापाचा उद्रेक…

हिवरखेड नगरपरिषद निर्माणात भारसाखळे यांचाच खोडा…ग्रामस्थांमध्ये संतापाचा उद्रेक…

आमदार समर्थक पदाधिकाऱ्यांचा सावध पवित्रा… आपला आक्षेप नसल्याचा केला खुलासा….

आकोट – संजय आठवले

हिवरखेड ग्रामपंचायत चे नगरपंचायतीत रूपांतर होण्याचे अंतिम टप्प्यात आमदार भारसाखळे यांनी खुसपट घालून अडथळा आणल्याने आणि त्यानंतर पुन्हा नगरपरिषद होण्याचे अंतिम टप्प्यातच संबंधित जि. प., पं. स. सदस्यांच्या संमतीचा घोळ निर्माण केला गेल्याने हा सारा खेळ आमदार भारसाखळे यांचाच असल्याची हिवरखेडात जोरदार चर्चा असून ग्रामस्थांमध्ये संतापाचा उद्रेक दिसून येत आहे. मात्र या उद्रेकाने वेळीच सजग झालेल्या आमदार समर्थक पदाधिकाऱ्यांनी सावध पवित्रा घेऊन नगरपरिषद निर्माणास आपली अनुकूलता दर्शविली आहे.

गत अनेक वर्षांपासून हिवरखेड ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये होणेकरिता ग्रामस्थांनी देव पाण्यात घातले होते. अनेक आंदोलने केली. मंत्रालयाच्या असंख्य वाऱ्या केल्या. कैकांचे उंबरठे झिजवले. पण यश मात्र हुलकावणीच देत राहिले. अखेर आमदार मिटकरीच्या सहकार्याने नगरपंचायतीची उद्घोषणा होईपर्यंतचा प्रवास पार पडला.

परंतु अचानक आमदार भारसाखळे यांना श्रेयाची अवदसा आठवली. आणि त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालून हिवरखेड नगरपंचायतीची लाकडे मसणात नेण्याची व्यवस्था केली.

भारसाखळे यांच्या या कृतीने हिवरखेडकरांचा आत्यंतिक जळफळाट झाला. थोरापासून पोरापर्यंत प्रत्येक जण भारसाखळे यांना दूषणे देऊ लागला. कावेबाज भारसाखळे हे सुद्धा प्रत्येक बारीक सारीक बाबींवर नजर ठेवून होते. त्यामुळे ग्रामस्थांच्या संतापाची त्यांना कल्पना आली.

त्याची दखल घेऊन नगरपंचायत ऐवजी नगरपरिषद करविण्याचे त्यांनी आश्वासन दिले. परंतु निकषपूर्ती होत नसल्याने त्यात अडचणी होत्या. अखेर त्या अडचणींना बगल देण्यात येऊन नगरपरिषदेची उद्घोषणा प्रसिद्ध करण्यात आली. आक्षेप, हरकतींचा टप्पा ही निर्विघ्नपणे पार पडला. हिवरखेडकरांना नगरपरिषद उंबरठ्यावर दिसू लागली.

आणि अचानक शासन दरबाराकडून नवा कोलदांडा घेऊन एक खलिता आला. ग्रामपंचायत नगरपरिषदेत रूपांतरित होताना १ जि.प. गट व २ पं. स. गण खालसा होणार आहेत. त्यामुळे न्यायालयीन निर्णयानुसार या सदस्यांना संधी देऊन त्यांचे मत जाणून घ्यावे, असे या पत्राने जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित केलेले आहे. शासनाच्या या आदेशाने हिवरखेड मधील वातावरण पुन्हा बिघडले आहे.

सद्यस्थितीत हिवरखेड येथील जि.प. सदस्य व एक पं. स. सदस्य भाजपचेच आहेत. या सदस्यांना आपली कारकीर्द पूर्ण करावयाची आहे. त्यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर टाकण्याकरिता आमदारांकडूनच ही शक्कल लढवली गेली आहे.

त्यामुळेच पूर्ण नोव्हेंबर महिना उलटल्यावरही अद्याप विद्यमान जि. प. व पं. स. सदस्य यांना सुनावणी करिता पाचारणच करण्यात आलेले नाही. परिणामी याप्रकरणी पुन्हा आंदोलनाची भूमिका घेण्याची चर्चा हिवरखेडात जोर धरू लागली.

त्यामुळे वातावरण पुन्हा चिघळण्याची चिन्हे दिसू लागली. परंतु अचानक या पदाधिकाऱ्यांनी पलटी मारली. आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी करिता पाचारण न करताही जि. प. सदस्य सौ. सुलभाताई दूतोंडे, पं. स. सदस्य सौ गोकुळाताई भोपळे आणि वंचितच्या सौ. सदफ नाजमीन यांनी १ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र दिले.

या पत्रात हिवरखेड नगरपरिषद होण्यास आपला आक्षेप नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे. यासोबतच लोककल्याणार्थ आपण मोठा त्याग केल्याचा संदेशही जनतेत पसरविला जात आहे.

परंतु आता कितीही सारवासारव केली तरी हिवरखेड नगरपरिषद होऊ न देणेकरिता आमदार भारसाखळे हेच जबाबदार असल्याचा संदेश जनतेच्या मनात कायम रुजला आहे हे मात्र नक्की.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: