Saturday, December 21, 2024
Homeराज्यभारसाखळे नापास ठरुनही उमेदवार म्हणून स्वीकारले…पण पास होऊनही मंत्रीपदी मात्र त्यांना झिडकारले…मुख्यमंत्री...

भारसाखळे नापास ठरुनही उमेदवार म्हणून स्वीकारले…पण पास होऊनही मंत्रीपदी मात्र त्यांना झिडकारले…मुख्यमंत्री फडणवीसांचे दुटप्पी धोरण… भारसाखळेंची अक्षमता चर्चेत…

आकोट – संजय आठवले

उमेदवारीचे प्रारंभीच संपूर्ण मतदारसंघात स्वपक्षीयांनीच केलेला विरोध डावलून तथा स्वतः जाहीर केलेली उमेदवारीची व्याख्या मोडीत काढून देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण मतदारसंघातील स्वपक्षातच एकही लायकीचा उमेदवार नसल्याचे दर्शवित बाहेरच्या भारसाखळे यांना नापास ठरूनही आकोटची उमेदवारी दिली.

परंतु त्यानंतर निवडणुकीत ते पास होऊन ज्येष्ठ आमदार ठरल्यावरही त्यांना मंत्रीपदाकरिता नापास ठरविल्याने आणि संपूर्ण जिल्ह्यात एकही मंत्री पद न दिल्याने फडणवीसांच्या दुटप्पी धोरणाबाबत सर्वत्र आश्चर्य मिश्रित नाराजीचे वातावरण पसरले आहे. त्यासोबतच भारसाखळे स्वतःच्या अक्षमतेनेच नापास असल्याची भावना जनतेत पक्की झाली आहे.

वाचकांना चांगलेच स्मरण आहे कि, राज्यात विधानसभा निवडणुकी करिता आकोट मतदार संघाची उमेदवारी घोषित करताना बाहेरचे प्रकाश भारसाखळे यांना स्थानिकांतर्फे विविध कारणांनी प्रचंड विरोध करण्यात आला. या विरोधात भाजपाचे नेते, कार्यकर्ते अगदी बिन्नीवर होते.

भारसाखळे यांना उमेदवारी न देण्याबाबत त्यांनी भाजपातील अनेक देवांना साकडेही घातले. त्यावर बराच काळपर्यंत भारसाखळे यांची उमेदवारी रोखून धरण्यात आली होती. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याची अटकळ लावली जात होती. मतदारसंघातील भाजप नेत्यांनी तसा दावाही केला होता.

त्यातच ना. नितीन गडकरी यांनी “आजारपण आणि वृद्धत्वामुळे आता थांबून जा” असा सल्ला भारसाखळे यांना दिला होता. परंतु आपले वेगळे समीकरण मांडून फडणवीस यांनी भारसाखळे यांना उमेदवारी दिली. मजेदार बाब म्हणजे निवडणुकीदरम्यान दक्षिण कराड मतदार संघातील जाहीर सभेत उमेदवार कसा असावा ह्याची व्याख्या फडणवीस यांनी विशद केली.

तरुण, उमदा, तडफदार कामसू इत्यादी विशेषणे आमदारकी करिता हवी असल्याचे ते बोलले. परंतु त्यातील एकाही कसोटीवर भारसाखळे उतरत नसल्याने आकोट मतदार संघात त्या वक्तव्याने फडणवीस यांची चांगलीच गोची झाली होती.

आमदारकी बाबतच्या फडणवीस यांच्या त्या व्याख्याने खुद्द फडणवीस यांनीच भारसाखळे यांना नापास उमेदवार ठरविले होते. परंतु भारसाखळे यांनी आपल्या ठेवणीतील करामतींद्वारे विधानसभा निवडणुकीत घवघवीत गुण घेऊन ही परीक्षा चांगल्या प्रकारे उत्तीर्ण केली.

या विक्रमाने भारसाखळे यांचे शिरपेचात आठव्यांदा आमदार होण्याचा मानाचा तुरा खोवला गेला. त्यामुळे आपले जेष्ठत्वाचे आधारे मंत्रीपदाचा बहुमान प्राप्त करण्याकरिता भारसाखळे जोमाने भिडले. त्यांच्या समर्थकांच्या आकांक्षाही जगनाला टेकल्या होत्या. परंतु भारसाखळे यांचे वर्तन, वृद्धत्व, अल्पशिक्षण आणि आजारपण ह्या बाबी प्रकर्षाने समोर आल्या.

आकोट मतदार संघातील भाजपाईंनी केलेल्या विविध कागाळ्या आणि देवेंद्र फडणवीस यांनी दस्तूर खुद्द याची देही याची डोळा अनुभवलेले प्रसंग यांनी भारसाखळे यांचा घात केला. ऐन निवडणूक प्रचारादरम्यान दर्यापूर येथे महायुती विरोधात अपक्ष उभ्या ठाकलेल्या उमेदवाराचा केलेला प्रचार भारसाखळे यांच्या गैरवर्तनाच्या माळेतील मेरू मणी ठरला.

सोबतीला सहकारी नेते व कार्यकर्ते यांना केलेला जाच, त्यांचेशी केलेले अगोचर वर्तन, त्यांचे आजारपण, त्यांचा वृद्धत्वाचा शीण, त्यांचे अल्पशिक्षण ह्या बाबींची फौजही दिमतीला होतीच. या साऱ्या गुणावंगुणांचे फडणवीस यांनी वस्तूनिष्ठ मूल्यांकन केले.

परिणामी भारसाखळे यांचे मंत्रीपदाचे मनोरे हवेतच ढासळले. आणि त्यांचे पदरी निराशा पडली. परंतु गमतीचा भाग म्हणजे या साऱ्या बाबी फडणवीसंना उमेदवारी देण्यापूर्वीच ठाऊक होत्या. तरी छातीला माती लावून त्यांनी भारसाखळे यांचेवर ब्लाइंड डाव लावला. म्हणजे उमेदवारीच्या स्वतःच्याच व्याख्येविरोधात ढिल देऊन त्यांनी नापास ठरलेल्या प्रकाश भारसाकळे यांना उमेदवार म्हणून स्वीकारले.

परंतु त्यांना मंत्रीपद देतेवेळी मात्र फडणवीस यांनी ती व्याख्या कसून घेतली. वास्तविक आधीच नापास ठरलेल्या उमेदवारीच्या परीक्षेत भारसाखळे यांनी उत्तम प्रदर्शन करून ती परीक्षा पास केली. त्यामुळे सद्यस्थितीतील प्रगतीचा आलेख पाहून आणि मागचे झाले गेले ते विसरुन भारसाखळे यांना मंत्रीपद देणे अकोला जिल्ह्याच्या हिताचे ठरले असते.

परंतु करेक्ट वेळी करेक्ट कार्यक्रम करण्याची खोड लागलेल्या फडणवीस यांनी करेक्ट वेळी भारसाखळे यांचा करेक्ट कार्यक्रम केला. सोबतच आमदार सावरकर यांनाही तगडा झटका देऊन संपूर्ण अकोला जिल्हा मंत्री पदाविना वंचित ठेवला.

वास्तविक फडणवीस यांनी ७४ वर्षीय गणेश नाईकांसह ७१ ते ७७ वयोगटातील ४ जणांना मंत्रीपदे दिली आहेत. त्यात आमदारकीमध्ये ज्येष्ठ असलेल्या भारसाखळे यांना सामावून घेणे फारसे अवघड नव्हते. पण त्यांनी भारसाखळे यांना हुलकावणी दिलीच. फडणविसांच्या या दुटप्पी खेळीने भारसाखळे हे त्यांचे लेखी नापास असल्याचे अधोरेखित झालेच सोबतच नागरीकांची ही धारणाही अगदी पक्की झाली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: