महेंद्र गायकवाड
नांदेड
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2022-23 अंतर्गत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांना अनुदान जलद संवितरण व सहनियंत्रणासाठी 14 जानेवारी 2024 परिपत्रक निर्गमित झाले आहे. सहाय्यक आहरण व संवितरण अधिकारी आणि अन्य अशासकीय कार्यान्वयन प्राधिकाऱ्यासाठी आभासी वैयक्तीक ठेव लेखा ही व्यवस्था व कार्यपध्दती लागु करण्यात आली आहे. या प्रणाली अंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी बँक खात्याचा कॅन्सल चेक, विहित नमुन्यातील अर्जासोबत दिलेल्या कागदपत्रासह अर्ज 30 सप्टेंबर 2024 पर्यत कार्यालयास कार्यालयीन वेळेत सादर करावा. विहित मुदतीनंतर आलेले अर्ज ग्राहय धरल्या जाणार नाहीत यांची सर्वानी नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडुन अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. यात भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये 13 जून 2018 रोजी शासन निर्णयानुसार थेट वितरीत करण्यात येते.
या योजनेअंतर्गत दाखल करावयाची कागदपत्रे-
लाभार्थी हा सन 2022-23 या वर्षात पात्र असावा, विहित नमुन्यातील अर्ज, ऑनलाईन प्रणालीचे दाखल केलेल्या अर्जाची पोच, चालू बँक पासबुक खात्याचे छायांकित प्रत, बँक खाते बदल असल्यास खाते बदलाबाबतचे शपथपत्र, बँक खात्याचे रद्द केलेला मूळ धनादेश, पॅनकार्ड छायाकिंत प्रत, आधार कार्ड छायाकिंत प्रत, विवाहीत असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र, लग्न पत्रिका आवश्यक, विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती 75 टक्के जास्त असणे बंधनकारक असेल. यानुसार 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत कार्यालयीन वेळेतपर्यत अर्जाची एक प्रिंट आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयीन वेळेत संबंधित शाखेस जमा करणे बंधनकारक राहील.
विद्यार्थ्यांने खोटी माहिती अथवा कागदपत्रे देवून लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेवून गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कार्यवाहीस पात्र राहील. तसेच त्यास दिलेल्या रकमेची 12 टक्के व्याजासह वसुली करण्यात येईल. तसेच अपूर्ण भरलेले/आवश्यक कागदपत्र सादर न केलेले अर्ज रद्द समजण्यात येतील व अपात्र, त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाही असेही समाज कल्याण कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.