Bharat Jodo Yatra : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ पुन्हा सुरू झाली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीही पहिल्यांदाच या यात्रेत सहभागी झाल्या असल्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री डीके शिवकुमार यांनी यावेळी सांगितले की, विजयादशमीनंतर आता राज्यात काँग्रेसचा विजय होईल. राज्यात आमची सत्ता येत असून भाजपची दुकानदारी बंद होणार आहे. सोनिया गांधी राज्याच्या रस्त्यावर उतरल्या याचा आम्हाला अभिमान आहे.
काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सोमवारी दुपारी म्हैसूरला पोहोचल्या होत्या. मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस भारत जोडो यात्रेला सुट्टी होती. गुरुवारी मंड्यातून भारत जोडो यात्रा पुन्हा सुरू झाली तेव्हा राहुल गांधींसोबत सोनिया गांधीही त्यात सामील झाल्या. त्यामुळे काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांचा उत्साह अनेक पटींनी वाढला.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सोनिया गांधी प्रकृतीच्या कारणामुळे निवडणूक प्रचारात सहभागी झाल्या नाहीत. बर्याच दिवसांनी त्या पक्षाच्या मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमात आणि कार्यकर्त्यांमध्ये सहभागी झाल्या आहेत. सुमारे पाच महिने चालणारी भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत जाईल. 3570 किलोमीटरच्या या संपूर्ण प्रवासात राहुल गांधी सहभागी असणार आहेत.