Monday, December 23, 2024
Homeराजकीयभारतात पसरवल्या जात असलेल्या द्वेष, हिंसा व भिती विरोधात भारत जोडो यात्रा...

भारतात पसरवल्या जात असलेल्या द्वेष, हिंसा व भिती विरोधात भारत जोडो यात्रा !: राहुल गांधी…

महाराष्ट्राप्रमाणे मध्य प्रदेशातही भारत जोडो यात्रेला मोठे जनसमर्थन मिळेल:- नाना पटोले

महात्मा गांधींनी जे काम स्वातंत्र्यापूर्वी केले तेच आज राहुल गांधी करत आहेत:- बाळासाहेब थोरात

महाराष्ट्रातील प्रचंड प्रतिसादानंतर भारत जोडो यात्रेचे मध्य प्रदेशात जल्लोषात स्वागत.

बोरडेली जि. बु-हाणपूर, दि. २३ नोव्हेंबर

भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्राने खूप चांगले नियोजन आणि आयोजन केले त्यासाठी त्यांना A+ गुण दिले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने मोठा पाठिंबा दिला. १४ दिवसात महाराष्ट्राकडून खूप काही शिकायला मिळाले. महाराष्ट्रातून सर्व देशात संदेश गेला आहे. आता मध्य प्रदेशात ३७० किलोमीटरची पदयात्रा करून पुढचा प्रवास करत श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवणार, याला कोणीही रोखू शकत नाही. भारतात द्वेष, हिंसा आणि भिती पसरवली जात आहे याविरोधात ही भारत जोडो यात्रा आहे, असे खा. राहुलजी गांधी यांनी म्हटले आहे.

भारत जोडो यात्रेने आज महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात प्रवेश केला. यावेळी बोरडेली जि. बू-हाणपूर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कमलनाथ यांच्याकडे तिरंगा सोपवला. हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

जनतेला संबोधित करताना राहुलजी गांधी म्हणाले की, भाजपा सरकार लोकांमध्ये भिती निर्माण करत आहे. शेतमालाला योग्य भाव न देऊन तसेच पीक विम्याची नुकसान भरपाई न देऊन शेतक-यांना घाबरवले जात आहे. कामगारांना मनरेगाचे काम न देऊन भिती निर्माण केली जात आहे. शेतकरी, कामगार, महिलांच्या मनातून ही भिती काढली पाहिजे. कोणालाही घाबरू नका हे सांगण्यासाठीच ही पदयात्रा आहे.

शिक्षण व बेरोजगारीवर बोलताना राहुलजी म्हणाले की, या पाच वर्षाच्या रुद्रला डॉक्टर व्हायचे आहे, याने तसे स्वप्न पाहिले आहे, त्यासाठी तो शिक्षण घेईल, डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेईल पण आजच्या हिंदुस्थानात रुद्रचे स्वप्न साकार होणार नाही कारण रुद्रसारख्या असंख्य मुलांना मी भेटलो त्यांच्या व्यथा ऐकल्या आहेत. शिक्षण संस्था खाजगी झाल्या आहेत. शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात पण एवढे करुनही तो डॉक्टर बनू शकत नाही दुसरेच काही तरी काम त्याला करावे लागेल. चार-पाच मोजक्या उद्योगपतींच्या हातात सर्व यंत्रणा दिली आहे, हा अन्याय करणारा हिंदुस्थान आहे आणि तो आपणास नको आहे.

युपीएचे सरकार होते तेव्हा ४०० रुपये गॅस सिलिंडर होता आज १२०० रुपये झाला आहे, पेट्रोल ६० रुपये लिटर होते आज १०७ रुपये झाले आहे, हा सर्व पैसा कोणाच्या खिशात जात आहे? हा सवाल करत आम्ही ‘मन की बात’ करत नाही, लोकांची ‘मन की बात’ ऐकतो, असा टोलाही मारला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले की, भारत जोडो यात्रेने ६ राज्य पूर्ण करून आता मध्य प्रदेशात प्रवेश केला. या यात्रेचे जल्लोषात स्वागत केले. मध्य प्रदेशातही भारत यात्रींना भरभरून प्रेम व पाठिंबा मिळेल. मध्य प्रदेशातही पदयात्रा आणखी यशस्वी होईल. महाराष्ट्राच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त करून मध्य प्रदेशही चांगले आदरातिथ्य करेल. महाराष्ट्रात यात्रेला लोकांचा भरपूर पाठिंबा मिळाला. विविध वर्गातील लोक यात्रेत सहभागी झाले होते. उत्कृष्ट आयोजनाबद्दल राहुलजी गांधी यांनी महाराष्ट्राचे कौतुक केले.

विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, कन्याकुमारी पासून सुरु झाल्यापासून प्रत्येक राज्यात प्रतिसाद वाढतोय. मध्य प्रदेशात भारत जोडो यात्रेचे जोरदार स्वागत झाले. भारतात विविधतेतून एकता निर्माण करत आहेत. महात्मा गांधी यांनी जे काम स्वातंत्र्यापूर्वी केलं ते आज राहुल गांधी करत आहेत. भारत जोडो यात्रा जेव्हा श्रीनगरला पोहोचेल तेव्हा संपूर्ण देश एक झालेला असेल याचा मला विश्वास आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: