Thursday, September 19, 2024
Homeराजकीयभारत जोडो न्याय यात्रा निवडणुकीसाठी नाही तर जनतेला न्याय देण्यासाठी...

भारत जोडो न्याय यात्रा निवडणुकीसाठी नाही तर जनतेला न्याय देण्यासाठी…

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची अमरावतीत आढावा बैठक संपन्न…

अमरावती दि. १८ जानेवारी भारतीय जनता पक्षाकडून अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाचे भांडवल केवळ राजकीय फायदा उठवण्यासाठी केले जात आहे. मंदीर अजून अर्धवट असून अर्धवट मंदिरात प्राणप्रतिष्ठा करणे अयोग्य आहे हे शंकराचार्यांनी जाहीरपणे सांगितले आहे परंतु भाजपाला घाई झाली असून निवडणुकीतील फायद्यासाठी राम मंदिर उद्घाटनाचा इव्हेंट केला जात आहे, असा आरोप प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेसच्या आढावा बैठकीची सुरुवात अमरावतीतून झाली. यावेळी रमेश चेन्नीथला प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते, ते पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष राम मंदिराच्या विरोधात नाही, सर्वांना आपले धार्मिक स्वातंत्र्य आहे. काँग्रेस पक्षातील अनेक नेतेही अयोध्येला जाऊन आले आहेत.

मकर संक्रांतीच्या दिवशी काँग्रेस नेते व उत्तर प्रदेशचे प्रभारी अविनाश पांडे यांनी सहकाऱ्यांसह अयोध्येला भेट देऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. अयोध्येला ज्यांना जायचे आहे त्याला विरोध केलेला नाही. भारतीय जनता पक्ष व नरेंद्र मोदी हे राजकीय फायद्यासाठी मंदिर उद्घाटनाचा इव्हेंट करत आहेत ते चुकीचे आहे आणि जनतेला ते माहीत आहे.

भारत जोडो न्याय यात्रेविषयी बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, राहुल गांधी यांनी मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रा सुरु केली असून या न्याय यात्रेला मोठे जनसमर्थन मिळत आहे. भारत जोडो न्याय यात्रा ही निवडणूक यात्रा नाही तर देशातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी आहे. यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी भारत जोडण्याचे काम करत आहेत, ही यात्रा देशासाठी आहे.

पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, महाराष्ट्र काँग्रेस सक्षम असून सर्व नेते एकत्र आहेत कोणाही पक्ष सोडून जाणार नाही. भारतीय जनता पक्ष अफवा पसरवून दिशाभूल करत आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे.

विभागीय बैठकीमध्ये संघटनात्मक तयारीचा आढावा घेण्यात आला. प्रदेश काँग्रेस कमिटीने दोन महिन्यापूर्वी जिल्हा काँग्रेस कमिट्यांना कार्यक्रम दिला होता त्याचा आढावाही घेतला जात आहे. आज अमरातीमध्ये बैठक झाली असून शेवटची बैठक मराठवाडा विभागात २९ तारखेला लातूरमध्ये होत आहे.

प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त प्रभारी रमेश चेनीथल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान,

चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, अनिस अहमद, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, AICC सचिव व सहप्रभारी आशिष दुआ, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आ. वजाहत मिर्जा, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, सुनिल देशमुख यांच्यासह अमरावती विभागातील सर्व जिल्हाध्यक्ष, प्रमुख नेते व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: