Rajasthan CM : छत्तीसगड आणि मध्य प्रदेशनंतर आता भाजपने राजस्थानमध्ये मुख्यमंत्री चेहरा जाहीर केला आहे. आता राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा असतील. जयपूर येथे विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. भजनलाल शर्मा यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. निरीक्षकांच्या उपस्थितीत विधीमंडळ पक्षनेतेपदाची एकमताने निवड करण्यात आली.
भजनलाल शर्मा हे सांगानेरचे आमदार आहेत. मूळचे भरतपूरचे असलेले भजनलाल शर्मा हे प्रदीर्घ काळापासून संस्थेत कार्यरत आहेत. शर्मा हे प्रदेश सरचिटणीस म्हणून काम पाहत आहेत. जयपूरच्या सांगानेरसारख्या सुरक्षित जागेवरून भाजपने त्यांना पहिल्यांदाच निवडणूक लढवायला लावली. विद्यमान आमदार अशोक लाहोटी यांचे तिकीट कापून भजनलाल शर्मा यांना उमेदवारी दिली. सांगानेर ही जागा भाजपचा बालेकिल्ला मानली जाते. भजनलाल शर्मा यांनी काँग्रेसच्या पुष्पेंद्र भारद्वाज यांचा ४८०८१ मतांनी पराभव केला.
विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत घेतला निर्णय
मंगळवारी सायंकाळी चार वाजता भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक सुरू झाली. या बैठकीत राजस्थानच्या नवीन मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात आली. या बैठकीत भाजपचे केंद्रीय निरीक्षक, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि दोन सहनिरीक्षक विनोद तावडे आणि सरोज पांडे उपस्थित होते. याआधी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह प्रल्हाद जोशी आणि दोन सहनिरीक्षक विनोद तावडे आणि सरोज पांडे हे विशेष विमानाने जयपूरला पोहोचले होते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले.
#WATCH | BJP names Bhajanlal Sharma as the new Chief Minister of Rajasthan pic.twitter.com/j3awHnmH7k
— ANI (@ANI) December 12, 2023