आकोट – संजय आठवले
राज्य शासनाद्वारे लाडकी बहीण योजनेचा मोठा गाजावाजा सुरू असतानाच या योजनेच्या लाभार्थी होण्यास उत्सुक महिलांची मात्र पालिकेकडून मिळणाऱ्या जन्म दाखल्या संदर्भात मोठी दमछाक होत आहे. परंतु दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रकाश भारसाखळे मात्र या संदर्भात पालिकेला सक्त सूचना देण्याऐवजी मतांची बेगमी करण्यात गुंतले आहेत.
राज्य शासनाने काहीच दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजना जाहीर केली. त्या संदर्भातील कागदपत्रांच्या जुळवा जुळवीकरिता महिलांनी तलाठी, सेतू केंद्र यांच्याकडे प्रचंड प्रमाणात गर्दी केली. त्याचा अनुचित लाभ घेणेकरिता तलाठी आणि सेतू केंद्रांनी महिलांची मोठी पिळवणूक सुरू केली. त्यावर विरोधी पक्षाने विधानसभेत आवाज बुलंद करून तलाठी आणि सेतू केंद्रांवर कडक कारवाईच्या सूचना केल्या. सोबतच काही अनावश्यक दाखले आणि वेळेचे बंधन ही शिथिल करण्याची मागणी केली. त्याची दखल घेऊन राज्य शासनाकडून ही शिथिलता प्रदान केली गेली. त्याने महिलांना बराचसा दिलासा मिळाला.
परंतु उर्वरित कागदपत्रांकरिता जन्म दाखला आवश्यक असल्याने महिलांची पालिका कार्यालयाकडे झुंबड उडाली. त्यामुळे पालिकेकडून हा दाखला वितरित करणेकरिता योग्य ती सुविधा प्राप्त करून देणे अगत्याचे आहे. परंतु आकोट पालिकेत मात्र हा दाखला मिळविण्याकरिता महिलांना अतोनात त्रास होत आहे. मात्र हा त्रास कर्मचाऱ्यांचा नसून ह्या कामाकरिता योग्य मनुष्यबळ न पुरविणाऱ्या पालिका प्रशासनाचा आहे. आकोट पालिकेत हा दाखला देणारे कार्यालय अतिशय कोंदट आणि अरुंद आहे.
तेथे ठेवलेल्या रेकॉर्डनेच हे कार्यालय गच्च भरलेले आहे. हे रेकॉर्ड शोधणाराला या ठिकाणी मोकळेपणाने वावरता ही येत नाही. वातायनाकरिता या कार्यालयाला एकही खिडकी नाही. सद्यस्थितीत उष्णतामान वाढलेले आहे. कार्यालयाच्या वर टिन पत्रे आहेत. त्यामुळे कार्यालयात कोंदट आणि उष्ण वातावरण आहे. त्या ठिकाणी पंख्याची सोय नाही. दाखले शोधणे आणि वितरित करण्याचे काम एकाच कर्मचाऱ्याकडे आहे. त्यामुळे कार्यालयाचे दारात नागरिकांची गर्दी होताच आतील वातावरणात श्वास गुदमरण्याजोगी स्थिती निर्माण होत आहे.
आधीच उष्ण आणि दमट वातावरण. त्यात श्वास घेण्यासही अडचण. अशा स्थितीत या कार्यालयात काम करणाऱ्याच्या आणि आत मध्ये दाटीवाटीने उभ्या असणाऱ्यांच्या अंगातून अक्षरशः घामाच्या धारा बाहेर निघत आहेत. कार्यालयाबाहेरही लोकांची प्रचंड गर्दी असते. त्यांच्यावर कधी कडक ऊन पडते. तर कधी पावसाची एखादी सर त्यांना भिजवून जाते. त्यापासून बचाव होणेकरिता कोणतीही व्यवस्था नाही. तशाही स्थितीत नागरिक मात्र दाखला मिळवायचाच अशा जिद्दीने रांगा लावून असतात. ह्या रांगा सकाळपासूनच लागतात.
ह्या कार्यालयापासून २०० फुट अंतरावर पालिकेच्या मुख्य कार्यालयात वरच्या मजल्यावर जाण्याकरिता एक जिना आहे. त्याच्याच बाजूला पालिकेची मुतारी आहे. संपूर्ण शहरात स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या पालिकेच्या या मुतारीत मात्र प्रचंड अस्वच्छता आहे. या जिन्यावरून चढ-उतार करताना नागरिकांना अक्षरशः नाकाला रुमाल लावूनच जावे लागत आहे. त्यामुळे ही पालिका आहे की त्रासिका आहे? असा प्रश्न निर्माण होतो.
वास्तविक पालिकेच्या तळमजल्याचा बराच भाग मोकळा आहे. त्या ठिकाणी ही जन्म दाखल्यांची गर्दी कमी होईपर्यंत का होईना जन्म दाखला वितरण कार्यालय ह्या मोकळ्या जागी स्थलांतरित करणे गरजेचे आहे. सोबतच ह्या कामी योग्य ते मनुष्यबळ पुरविणे ही अत्यावश्यक आहे. विशेष म्हणजे पालिका प्रशासन आमदार प्रकाश भासाखळे यांचे मुठीत आहे. लाडकी बहीण ही योजना त्यांच्याच सरकारने लागू केलेली आहे. लोकसभेत बसलेला फटका विधानसभेत भरून काढण्याच्या महत्त्वाकांची हेतूने ही योजना लागू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या जोरावर महिला वर्गाची मते मोठ्या प्रमाणात खेचण्याचा विद्यमान शासनाचा मानस आहे.
त्यामुळे महिलांना होईल तितकी सुविधा पुरविणे ही आमदार प्रकाश भारसाकळे यांची नैतिक जबाबदारी आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे येत्या विधानसभेत त्यांना पुन्हा उभे राहायचे आहे. त्याकरिता त्यांच्या ढासळत्या लोकप्रियतेमध्ये वृद्धी करणे त्यांना गरजेचे आहे. म्हणूनच त्यांनी पालिका प्रशासनास योग्य त्या सूचना देऊन जन्मदाखले सहजरित्या वितरित करविण्याची तजबीज करणे अगत्याचे आहे. आमदार भारसाखळे मतांच्या जुळवणी करिता अत्र तत्र सर्वत्र संचार करीत असतात. त्याच हेतूने याबाबतीतही त्यांनी महिलांची योग्य सोय पुरवणे काळाची गरज आहे. करतील काय ते असे?