गावनदीपात्रात संपन्न होणारा परिसरातील पहिला पुरस्कार वितरण समारंभ…
दर्यापूर – आपल्या सर्वांगीण कर्तृत्व सेवेने विविध प्रतिष्ठित पुरस्कारांचे मानकरी ठरलेले दर्यापूरच्या सुप्रसिद्ध गाडगेबाबा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा मूळ दर्यापूर तालुक्यातील बेलोरा हे जन्मस्थान असलेले माजी सरपंच प्रा. गजानन रामकृष्ण भारसाकळे यांना बेलोरा ग्रामवासियांनी त्यांच्या ३० नोव्हेंबर या जन्मदिनाच्या निमित्याने पहिल्या ग्रामरत्न पुरस्काराची घोषणा केली आहे.
प्रा. भारसाकळे यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत तथा श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय अकोला येथून अभियांत्रिकी पारंगत स्थापत्य पदवी प्राप्त केली असून ते सध्या याच अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
शालेय जीवनापासून कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात आवड असणाऱ्या प्रा. गजानन भारसाकळे यांनी अनेक वकृत्व स्पर्धा गाजवून कबड्डी या खेळात विशेष नैपूण्य प्राप्त केले आहे. शिक्षण पूर्णतेनंतर त्यांनी बेलोरा या गावाचे ग्रामपंचायत सरपंच तथा सेवा सहकारी सोसायटी अध्यक्षपदावर यशस्वी कार्य केलेले आहे.
तसेच त्यांनी आजवर शासकीय कमेटी सदस्य, नगरपरिषद स्वच्छता दूत, विद्यापीठ पुरस्कार निवड समिती सदस्य इत्यादी पदे भूषविली असून ते अकोला येथील अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.
अभियांत्रिकी विषयात प्राध्यापकाची नोकरी स्विकारल्यानंतर प्रा. भारसाकळे यांनी १९९७ साली स्थापन केलेल्या गाडगेबाबा मंडळ या बहुउद्देशीय सामाजिक संघटनेद्वारे नेत्रदिपक समाज कार्याची नोंद केलेली आहे. संपूर्ण देशात चर्चित आईमहोत्सव या ज्ञान, मनोरंजन, प्रबोधन कार्यक्रमाची संकल्पना मांडून या यशस्वितेने त्यांची संपूर्ण महाराष्ट्रभर या महोत्सवाचे जनक म्हणून ओळख निर्माण झालेली आहे.
सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात काम करतांना त्यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे दोन्ही प्रतिष्ठेचे पुरस्कार म्हणजे गाडगेबाबा सामाजिक कार्य पुरस्कार २०१९ व पर्यावरण पुरस्कार २०२३ प्राप्त झालेले आहेत. हे दोन्ही पुरस्कार एकत्रित मिळविणारी एकमेव व्यक्ती म्हणून त्यांच्या नावाची आज विद्यापीठात नोंद झाली असून ही बाब अत्यंत भूषणावह ठरणारी आहे.
आयवा या अभियांत्रिकी क्षेत्रातील राष्ट्रीय संघटनेच्या अमरावती शाखेने जलव्यवस्थापन विषयात केलेल्या अभिनव कार्याबद्दल प्रा.भारसाकळे यांना ऐमिनंन्ट इंजिनिअर २०२४ पुरस्काराने तसेच शासनाद्वारे उत्कृष्ट रुग्णवाहिका सेवा पुरस्काराने सुद्धा सम्मानित करण्यात आले आहे.
ख्यातनाम संत तथा विदर्भाचे ज्ञानेश्वर म्हणून ओळख असलेले संत अच्युत महाराज यांचे अलोट साहित्याचे संमेलन तसेच राज्य ते आतंरराष्ट्रीय स्तरावरील जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर जन्मोत्सव सोहळा आयोजनाने अध्यात्म व विज्ञान संगमाचे समाज प्रबोधन साधण्यात त्यांच्या संकल्पनेला यश प्राप्ती मिळालेली आहे.
प्रा. गजानन भारसाकळे यांनी दर्यापूर तालुक्यात माहुली (धांडे) ग्राम परिसरात गोरक्षण संस्थेची गेल्या चार वर्षांपासून स्थापना केलेली असून या गो सेवा कार्यामुळे तसेच या कार्यस्थळावरील संशोधन कार्याच्या प्रक्रियेमुळे त्यांना केळीवेळी येथील प्रतिष्ठेच्या स्व. रामकृष्ण आढे विदर्भ भूषण पुरस्काराने सम्मानित करण्यात आलेले आहे.
या सर्व जीवन कार्याने प्रभावित झालेल्या प्रा. भारसाकळे यांच्या बेलोरा जन्मभूमीतील संपूर्ण गावकरी यांनी त्यांना कार्य गौरवपर ग्रामरत्न पुरस्काराची घोषणा ग्रामपंचायत बेलोरा तथा समस्त गावकरी यांचे वतीने प्रफुल्ल जगन्नाथ पाटील भारसाकळे, सरपंच राजेंद्र धुवे यांनी संयुक्तपणे गावकरी यांच्या उपस्थित त्यांच्या ३० नोव्हेंबर या जन्मदिवसाच्या निमित्याने गोररक्षण स्थळी केली.
बेलोरा गावालगत वाहत जाणाऱ्या चंद्रभागा नदी पात्रात येत्या फेब्रुवारी महिन्यात हा सोहळा आमंत्रित मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून गावनदीपात्रात संपन्न होणारा बहुधा हा पहीला पुरस्कार वितरण सोहळा असेल. आयुष्यभर या सर्वांगीण कार्यात अतिव्यस्त असतांना सुद्धा ग्राम बेलोरा या जन्मस्थळाशी तथा दर्यापूर परीसर या कर्मभूमीशी आजपर्यंत कधीही नाळ न तुटुदेणारे प्रा. भारसाकळे हे कर्तृत्व सिद्ध व्यक्तिमत्व ठरत असल्याने या पुरस्काराला अनन्य साधारण महत्व प्राप्त असल्याचे प्रतिपादन बेलोरा वासियांनी या पुरस्कारा निमित्ताने केले आहे.
तसेच प्रा. गजानन भारसाकळे यांचे या कार्यातील मार्गदर्शक, संपूर्ण सवंगडी तथा आप्तेष्ट, संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेल्या गाडगेबाबा मंडळाचे सर्व सभासद तसेच दर्यापूर शहरातील तथा अकोला अभियांत्रिकी महाविद्यालयातील देश विदेशात कार्यरत माजी विद्यार्थी व स्नेहीजनांनी या जन्मस्थळाच्या ग्रामरत्न पुरस्कारा बद्दल त्यांचे वर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.