अकोला – संतोषकुमार गवई
बालविवाहात सहभागी लग्नपत्रिका छापणारे, वाजंत्री, मंगल कार्यालयचालक, पौरोहित्य करणारे व व-हाडी मंडळी अशा सर्वांवर गुन्हे दाखल होतात. जिल्ह्यात कुठेही बालविवाह झाल्यास त्यात सहभागींना तुरूंगात जावे लागेल, असा इशारा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी दिला आहे.
जिल्हा बालविवाह मुक्त करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. विवाहाचे मुलींचे वय १८ व मुलांचे २१ वर्ष आहे. मात्र, तरीही बालविवाह होत असल्याचे निर्दशनास येत आहे. विवाहात सहभागींना बालविवाह प्रतिबंध अधिनियमानुसार दोन लाख रूपये दंड किंवा ५ वर्ष सक्त मजुरी किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. प्रिंटींग प्रेस, मंगल कार्यालय वाजंत्री, लग्न लावणारे पौरोहित्य करणारे व लग्न सोहळ्यामध्येसहभागी होणारी वन्हाडी मंडळी यांच्यावर गुन्हे दाखल होतात.
गावातील सरपंच, पोलीस पाटील व ग्रामसेवक यांनी गावामध्ये बालविवाह होणार नाही या बाबत खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. ग्रामसेवक हे बालविवाह प्रतिबंध अधिनियमानुसार विवाहप्रतिबंध अधिकारी आहेत व शहरी भागाकरीता बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) हे आहेत. सरपंच हे ग्राम बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष असून पोलीस पाटील हे सदस्य आहेत.
पोलीस पाटील हे गाव व पोलीस स्टेशन यांना जोडणारा मुख्य दुवा आहे. गावात कोणाचा विवाह ठरल्यास त्या मुलामुलींच्या वयाची खात्री करण्यात यावी जेणेकरून गावात बालविवाह होणार नाही व अकोला हा बालविवाहमुक्त जिल्हा होईल, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.