Sunday, December 22, 2024
Homeराज्यखबरदार रावण दहन कराल तर…आदिवासी बांधवांचा ईशारा…जिल्हाधिकारी यांनी घेतली दखल...नियमानुसार कारवाई करण्याचे...

खबरदार रावण दहन कराल तर…आदिवासी बांधवांचा ईशारा…जिल्हाधिकारी यांनी घेतली दखल…नियमानुसार कारवाई करण्याचे दिले आदेश…

आकोट – संजय आठवले

महापंडित तथा महान शिवभक्त म्हणून मान्यता प्राप्त राजा, महात्मा रावणाची प्रतिमा दहन करण्याची भारतभर सुरू असलेली परंपरा आता मोडीत निघणार असून असे दहन करणारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा आदिवासी बांधवांनी दिला आहे.

या संदर्भात जिल्हाधिकारी भंडारा यांनी दखल घेतली असून या ईशार्‍याचे अनुषंगाने नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा यांना दिले आहेत. रामायणात खलनायक आणि महापंडित तथा महान शिवभक्त म्हणून महात्मा रावणाचा उल्लेख येतो.

जगातील सारी दुषणे रावणाचे डोईस बांधून दरसाल त्याची प्रतिमा दहन करण्याची भारतभर परंपरा आहे. परंतु काही वर्षांपासून आदिवासी बांधव या परंपरेने व्यथित व अस्वस्थ होत आहेत. महात्मा रावण हा महापंडित, महान शिवभक्त आणि आपला पूर्वज असल्याची ह्या आदिवासी बांधवांची श्रद्धा आहे.

महत्त्वाचे म्हणजे भारतात रावणाचे वंशज आढळून आल्याचे वृत्त अनेकदा प्रकाशित झाले आहे. त्यासोबतच आदिवासी बांधवांनी रावण दहनाला वारंवार विरोध केल्याचेही अनेक दाखले आहेत. त्याच अनुषंगाने रावण दहन करण्याची प्रथा बंद करण्याचा निर्धार आदिवासी बांधवांनी केला आहे.

त्याचे प्रथम पाऊल म्हणून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली, शाखा तुमसर, मोहाडी जिल्हा भंडारा व ऑल इंडिया आदिवासी पीपल्स फेडरेशन नागपूर, शाखा तुमसर जिल्हा भंडारा यांनी आदिवासी राजा, महात्मा रावण याचे दहन करण्याची प्रथा बंद करण्याची मागणी केली आहे.

यासोबतच दसऱ्याच्या दिवशी जी मंडळे अथवा व्यक्ती आदिवासी राजा, महात्मा रावणाच्या पुतळ्याचे दहन करतील त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करण्याचीही मागणी केली आहे. ही प्रथा बंद न झाल्यास अनुसूचित जनजाती समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्याचा ईशाराही या बांधवांनी शासनास दिला आहे.

हे नियोजन प्राप्त होताच जिल्हाधिकारी भंडारा यांनी त्याची त्वरित दखल घेतली आहे. या प्रथेच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून त्याचा भंग करणारांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी भंडारा यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा यांना दिले आहेत. या सोबतच तहसीलदार मोहाडी/ तुमसर, पालिका मुख्याधिकारी मोहाडी/ तुमसर, तथा गटविकास अधिकारी मोहाडी/ तुमसर यांनाही दक्षता घेणे बाबत सूचित करण्यात आले आहे.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: