रामटेक – राजू कापसे
समाजोपयोगी जीवन जगत आपल्या कृतीने श्रीरामजी अस्टनकर हे सामाजिक ,सांस्कृतिक जीवनातील आधारवड ठरल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले..२० ऑगस्ट रोजी विदर्भ साहित्य संघ शाखा रामटेकच्या वतीने माजी अध्यक्ष स्व.श्रीरामजी अस्टनकर यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन समर्थ विद्यालय रामटेक येथे करण्यात आले होते.त्याप्रसंगी प्रमुख मान्यवर बोलत होते..
वि.सा.संघ रामटेकचे अध्यक्ष श्री.दीपकजी गिरधर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या श्रद्धांजली कार्यक्रमात श्री.ऋषिकेश किंमतकर,प्रा.डॉ.सावन धर्मपुरीवार,प्रा.डॉ.रवींद्र पानतावणे , सौ.उमाताई काठीकर,प्रा.डॉ.जगदीश गुजरकर ,प्रा.मिनाज पौचातोड,शिक्षक सुभाष चव्हाण,श्री.अरुण जाधव, प्रा. संतोष ठकरेले, कविवर्य प्रा.डॉ गिरीश सपाटे व कार्यक्रमाध्यक्ष श्री.दीपकजी गिरधर यांनी आपले विचार व्यक्त केले.
श्रीरामजी अस्टनकर हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते.क्रीडा,शिक्षण,समाजकारण,राजकारण,सहकार,साहित्य क्षेत्रात त्यांनी जाणीवपूर्वक कार्य केले.त्यांनी कटुंबाकडे परिपूर्ण लक्ष देताना आपली सामाजिक, सांस्कृतिक भूमिका नि:स्वार्थीपणे पार पाडली.सहकार क्षेत्रात ते विशेष रमले.साहित्यावर मनापासून प्रेम करताना त्यांनी स्वतःतील कविताही फुलवली.
त्यांनी आपल्या कवितेतून राजकारणाचा सारीपाट मांडत असताना समाजातील दंभावर प्रहार केला.नेहमीच प्रत्येकाला मदतीचा हात ते द्यायचे.प्रत्येकाशी मित्रत्वाच्या नात्याने वागायचे.अशा आशयाचे विचार श्रद्धांजली सभेतील मान्यवरांनी व्यक्त केले.अस्टनकर सरांच्या निवडक कवितांचे अभिवाचन व कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ.पवन कमडी यांनी केले.