Saturday, November 16, 2024
Homeराज्यप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचे लोकार्पण...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचे लोकार्पण…

वाशिम – दि. 5 बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथील बंजारा विरासत संग्रहालयाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी, प्रधानमंत्री मोदी यांनी नगारा भवन परिसरातील बंजारा विरासत संग्रहालयाची पाहणी करुन बंजारा समाजाच्या संस्कृती व इतिहास यासंदर्भात माहिती जाणून घेतली. तसेच नगारा वाद्याचे वादनही त्यांनी केले. यावेळी बंजारा समाजातील परंपरागत नृत्य प्रधानमंत्र्यांसमोर सादर करण्यात आले.

श्री. संत सेवालाल महाराज, पोहरादेवी तीर्थश्रेत्र विकास आराखड्यांतर्गत 723 कोटी रुपये खर्चून या तीर्थश्रेत्राचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. या संग्रहालयात बंजारा समाजातील रुढी-परंपरा, पारंपारिक वेशभूषा, सांस्कृतिक इतिहास आदीबाबत विविध कलाकृतींच्या माध्यमातून माहिती प्रतिबिंबीत केली आहे. याप्रसंगी प्रधानमंत्री महोदयांनी बंजारा समाजातील प्रतिष्ठीत व्यक्ती आणि संतमहंत यांच्यासोबत मनमोकळा संवाद साधला.

यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रधानमंत्र्यांचे स्वागत

आज सकाळी प्रधानमंत्री महोदयांचे हेलिकॉप्टरने वाईगौळ येथील हेलिपॅडवर आगमन झाले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्र्यांचे स्वागत केले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड तसेच अपर पोलीस महासंचालक नवल बजाज, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा पोलीस आयुक्त अनुज तारे आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी पोहरादेवी येथील जगदंबा मातेचे तसेच संत सेवालाल महाराज व संत रामराव महाराज यांच्या समाधींचे दर्शन घेतले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: