Bangladesh Fire : बांगलादेशची राजधानी ढाका येथील एका इमारतीला लागलेल्या आगीत ४४ जणांचा मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही आग बेली रोडवर असलेल्या एका इमारतीत लागली, जिथे अनेक रेस्टॉरंट आहेत. अग्निशमन दलाने बचावकार्य सुरू केले आहे. त्यांनी सातव्या मजल्यावरून 70 लोकांना बाहेर काढले, ज्यात 42 बेशुद्ध होते. बांगलादेशचे आरोग्य मंत्री सामंत लाल सेन, ढाका-8 खासदार एएफएम बहाउद्दीन नसीम आणि अनेक वरिष्ठ अधिकारी आणि नेते घटनास्थळी पोहोचले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस, आरोग्य विभाग आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी व कर्मचारीही घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरू केले.
75 जखमींना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठवण्यात आले
आरोग्य मंत्री सेन यांनी रात्री 2 वाजता माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री उशिरा आग लागली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ढाका मेडिकल कॉलेजमध्ये ३३ तर शेख हसीना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बर्न अँड प्लास्टिक सर्जरीमध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी मध्यवर्ती पोलीस रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला. दरम्यान, आयजीपी चौधरी अब्दुल्ला अल मामून यांनी सांगितले की, आतापर्यंत 75 जणांची सुटका करण्यात आली आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
एका रेस्टॉरंटमध्ये 9.45 वाजता आग लागली, ती वेगाने पसरली.
बचाव कार्यात गुंतलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले की, इमारतीवरून उडी मारल्याने आणि जळल्यामुळे बहुतेक लोकांचा मृत्यू झाला. गुदमरून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अग्निशमन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पहिल्या मजल्यावर असलेल्या कच्छी भाई रेस्टॉरंटमध्ये रात्री 9.45 च्या सुमारास आग लागली, जी लगेचच इतर रेस्टॉरंटमध्ये पसरली. आग लागली ती वेळ हॉटेल्ससाठी सर्वात व्यस्त वेळ होती. यावेळी हॉटेल्समध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते, त्यामुळे मोठी जीवितहानी झाली. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार आग पसरण्याचे मुख्य कारण रेस्टॉरंटमध्ये असलेले गॅस सिलिंडर आहे. आगीमुळे धुराचे लोट पसरल्याने लोक घाबरले आणि वेळेत जागा न सोडल्याने त्यांची प्रकृती बिघडली.
A massive fire raged through a six-storey building in Bangladesh's capital Dhaka, killing at least 43 people and injuring dozens https://t.co/cmtChquxEi pic.twitter.com/nC2Y3vIDTu
— Reuters (@Reuters) March 1, 2024