मूर्तिजापूर येथे शहर पोलीस स्टेशन ला गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक श्री घुगे यांनी नुकतेच काही दिवसांपूर्वी पथकासह मूर्तिजापूर येथील चिखली गेट जवळ आरोपी हर्षल गुणवंत गावंडे मूर्तिजापूर येथील चिखली गेट जवळ मोटरसायकल वरून येताना त्याला अडवून त्याचे जवळ असणाऱ्या दोन पोतड्यांची पाहणी केली.
आरोपीच्या ताब्यात शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखूजन्य गुटखा व सुगंधित पान मसाला वगैरे व एक मोटर सायकल असा एकूण रुपये 61200 चा मुद्देमाल मिळून आला सदर मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून दोन पंचांसमक्ष जप्त करण्यात आला व आरोपीविरुद्ध फिर्यादी पक्ष तर्फे शहर पोलीस स्टेशन मुर्तीजापुर येथे गुन्हा क्रमांक २४०/२०२३ भादवि चे कलम १८८, २७२, २७३, व ३२८ प्रमाणे आणी अन्न व सुरक्षा मानके अधिनियमाच्या कलम २६(२) व ५९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी तर्फे जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला.
आरोपीचे वकील सचिन वानखडे यांनी युक्तीवादा दरम्यान न्यायालयात सांगितले की सदर गुन्ह्यांमध्ये आरोपीचा कोणताही सहभाग नसून जप्त मुद्देमालाशी आरोपीचा काहीही संबंध नाही तसेच जोपर्यंत रासायनिक पृथक्करणाचा अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत आरोपी विरुद्ध तथाकथित गुन्हा दाखल करता येणार नाही तसेच मुद्देमालाचे स्वरूप पाहता भारतीय दंड विधान कलम 328 मधील तरतुदी आरोपी विरुद्ध लागू होणार नाहीत.
परिणामतः आरोपीस सदर गुन्ह्याकामी अटक करण्यात आल्यानंतर तो न्यायालयीन कोठडीत असून उर्वरित तपासाकरिता सदर आरोपीस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नाही खटला चालून निकाल होण्यास बराच कालावधी लागणार आहे त्यामुळे आरोपीचा जामीन मंजूर करण्यात यावा अशी विनंती त्यांनी न्यायालयास केली.
याउलट सरकारी पक्षातर्फे न्यायालयास सांगण्यात आले की आरोपी विरुद्ध नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असून सदर गुन्ह्यातील अन्य आरोपी हा फरारी आहे आरोपीकडून पुन्हा याच स्वरूपाचा गुन्हा घडण्याची व त्याचे कडून साक्षीदार, पंचांवर दबाव आणला जाण्याची शक्यता असल्याने सदरचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपीस सशर्त जामीन मंजूर केला. आरोपी तर्फे वकील सचिन वानखडे व वकील त्र्यंबक यदवर यांनी काम पाहिले.