Monday, December 23, 2024
Homeराज्यपर्जन्य राजाच्या आगमाची ललकारी देत आला बहुगुणी बहावा…साज शृंगार तयाचा असा कि...

पर्जन्य राजाच्या आगमाची ललकारी देत आला बहुगुणी बहावा…साज शृंगार तयाचा असा कि नित्य नयनी साठवावा…

आकोट – संजय आठवले

मानव कितीही कृतघ्नतेने वागला तरी निसर्ग राजा मात्र मानवाला असंख्य अनमोल देणग्या दोन्ही करांनी भरभरून देत आला आहे. त्यातीलच एक अनमोल देणगी आहे बहावा अर्थात अमलतास हा वृक्ष. सहसा सौंदर्य आणि बहुगुणीत्व यांचा संगम फारच अभावाने आढळतो.

मात्र निसर्ग राजाने सौंदर्य आणि बहुगुणीत्व यांचा अलौकिक मिलाफ या वृक्षाचे ठायी केला आहे. अलौकिक नयन सुखासह मानवाला अपरिमित शारीरिक आणि मानसिक सौख्य देणारा हा अनमोल ठेवा निसर्गाने बहावाच्या रूपाने मानवाचे हवाली केला आहे.

अतिशय मनमोहक लावण्य आणि तितकेच बहुगुणीत्व या सोबतच निसर्गाने बहावाकडे भारतीय पर्जन्य राजाच्या आगमाची ललकारी देण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही सोपविलेले आहे. हा अतुलनीय रूपवान बहावा संपूर्ण नटल्यावर साधारणतः ६० दिवसात भारतीय पर्जन्याचे आगमन होते असा अनुभव आहे.

त्यामुळेच या वृक्षाला इंडियन रेन इंडिकेटर ट्री अर्थात भारतीय पर्जन्य राजाचा राजदूत म्हणून ओळखले जाते. यासोबतच आपल्या देखण्या रूपामुळे त्याला गोल्डन शॉवर ट्री, इंडियन लॅबर्नम, शॉवर ऑफ फॉरेस्ट असेही म्हणतात. त्याच्या बहुगुणी शेंगांमुळे त्याला पुडिंग पाईप ट्री म्हणूनही ओळखले जाते.

मराठीमध्ये त्याला बहावा तर हिंदीमध्ये अमलतास या नावाने ओळखतात. त्याचे शास्त्रीय नाव कॅशिया फिस्टूला असे आहे. तर संस्कृतमध्ये त्याची सुवर्णवृक्ष, राजवृक्ष, आरग्वध या नावानी नोंद आहे. अत्यंत बहुगुणी असल्याने आयुर्वेदात त्याचा गुरु या नावाने सन्मान केला जातो. ईतकी नावे लाभलेला हा जगातील एकमेव वृक्ष आहे.

अर्थात इतकी नावे प्राप्त होण्यामागील कारण त्याचे अद्भुत रूप आणि मौलिक औषधी गुणांचा ठेवा हेच आहे. या वृक्षाची प्रकृती शीत असून त्याची मुळे, साल, पाने, फुले व शेंगा या विविध रोगांवरील बहुगुणी औषध म्हणून सुविख्यात आहेत.
वास्तविक बहावा हा वृक्ष भारतीय वंशाचाच आहे.

मात्र त्याची खरी ओळख सन २००२ मध्ये झाली. त्यानंतर त्याची कीर्ती संपूर्ण आसमंतात पसरली त्यायोगे हा वृक्ष थायलंडचा राष्ट्रीय वृक्ष म्हणून मान्यता पावला तर भारतातील केरळ राज्याने बहावाचे फुलास राज्य फुलाचा बहुमान दिला. बहावाचा प्रत्येक अवयव अनमोल औषधींनी भरलेला आहे.

त्याचे सेवनाने मानवाचे पाचनशक्तीत कमालीची वृद्धी होते. त्यासोबतच हा वृक्ष ज्वरनाशक, वातनाशक, पित्तनाशक, कफनाशक आहे. चर्मरोग, उदररोग, मुखरोग, श्वासरोग, दमा, अस्थमा यावर उत्तम गुणकारी आहे. अर्धांग वायू, अल्सर, हृदयरोग, अंडकोष वृद्धी या रोगांचाही तो कर्दनकाळ आहे.

त्यामुळेच आयुर्वेदाने त्याचा गुरु या नावाने स्वीकार केला आहे. दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च महिन्यात त्याची पूर्ण पानगळ होते. त्यानंतर एप्रिल, मे हे महिने त्याच्या बहराचा काळ असतो. या काळात बहावाचे रूप अवर्णनीय असते. झळाळत्या सुवर्णासारख्या पिवळ्या धम्म फुलांनी हा वृक्ष सर्वांगी बहरतो.

लटकविलेल्या सुवर्ण लडींसारखी त्याची फुले शाखांवर झुलत असतात. हे अनुपम सौंदर्य पाहून जनमानस आपसूकच मोहित होतो. त्यामुळेच कवींनी बहावाला सुवर्णालंकारांनी नटलेल्या नववधूची उपमा दिली आहे.

सांप्रत काळी अशाच सुवर्णलडी अंगभर मिरवीत बहावा पर्जन्यराजाच्या आगमाची वर्दी देत उभा आहे. सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांनी भावाच्या रूपाचे यथार्थ वर्णन केलेली कविता एकदा वाचायलाच हवी…

नकळत येती ओठावरती तुला पाहता शब्द वाहवा,
सोनवर्खिले झुंबर लेउन दिमाखात हा उभा बहावा
लोलक इवले धम्मक पिवळे दवबिंदूतून बघ लुकलुकती, हिरवी पर्णे जणू कोंदणे साज पाचुचा तया चढवती ॥
कधी दिसे नववधू बावरी हळद माखली तनु सावरते.!

झुळुकीसंगे दल थरथरता डूल कानिचे जणू हालते
युवतीच्या कमनीय कटीवर झोके घेई रम्य मेखला,
की धरणीवर नक्षत्रांचा गंधर्वांनी झुला बांधला

पीतांबर नेसुनी युगंधर जणू झळकला या भूलोकी,
पुन्हा एकदा पार्थासाठी गीताई तो सांगे श्लोकी
ज्या ज्या वेळी अवघड होई ग्रीष्माचा तुज दाह सहाया,
त्या त्या वेळी अवतरेन मी बहावा रुपे तुज सुखवाया
इंदिरा संत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: