बदलापूर येथील चिमुरड्या मुलींच्या लैंगिक अत्याचाराची घटना एक अत्यंत घृणास्पद आणि माणुसकीला काळीमा फासणारी होती. या घटनेचा आपल्या समाजावर खोलवर परिणाम झाला. आपल्या समाजात लहान मुलांचे संरक्षण करण्याला आपण प्राधान्य देतो आणि तरीही अशा भयानक घटना समोर येतात.
यामुळे समाज हादरून जातो. बालवाडीतील मुलींवर त्यांच्या शाळेत अत्याचार होणे ही एक गंभीर घटना आहे. सुसंस्कृत समाजामध्ये अशा घटना अजिबात घडू नये. आपण या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन देशातील महिला आणि लहान मुलांचे संरक्षण करणारे कठोर कायदे बनवण्यासाठी पाऊले उचलणे आवश्यक आहे.
या क्रूर गुन्ह्याला गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही लहान मुलांवर किंवा महिलांवर अशी परिस्थिती ओढवू नये यासाठी भविष्यात अशा घटना रोखल्या जाणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आपण देशभरात लैंगिक हिंसाचाराच्या घटना पाहिल्यास आपल्याला नक्कीच प्रश्न पडतो की महिला नक्की सुरक्षित आहेत का?.
या गंभीर विकृतीवर शाश्वत उपाय शोधण्याचा एकमेव मार्ग म्हणजे योग्य कायदा आणि जागरूकता. या घटना अत्यंत क्रूर आहेत आणि त्यांना मानवतेविरुद्धचे गुन्हे मानले पाहिजे. मात्र या गुन्ह्यांचा राजकीय संधिसाधूंकडून स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी वापर केला जात आहे.
लैंगिक हिंसाचाराला बळी पडलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. मात्र यामध्ये आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करणारे काही राजकीय नेते आहेत.
प्रत्येक घटनेमध्ये राजकारण करण्याचा आता जणू काही ट्रेंडच झाला आहे. पुरावे गोळा होण्याआधी आणि तपासाचा निष्कर्ष निघण्यापूर्वीच राजकारण केले जाते. बदलापूरच्या बाबतीत सुद्धा आपल्याला असाच प्रकार झालेला दिसतो. त्यामुळे राजकारण करणाऱ्या लोकांना बाजूला करणे आणि स्वतःच्या राजकीय हेतूने या विषयांमध्ये लक्ष देणाऱ्या लोकांना सोयीस्करपणे दुर्लक्ष करणे गरजेचे आहे.
आपण हे लक्षात घेतले पाहिजे की सदर घटना घडलेल्या शाळेतील विश्वस्त मंडळामध्ये सर्वच राजकीय पक्षातील नेते मंडळींचा समावेश आहे. अगदी शिवसेना उबाठा या पक्षाशी संलग्न असलेले नेते सुद्धा आहेत. मात्र यामुळे तपास प्रक्रियेला काही ठोस दिशा मिळते का? उलट त्यामुळे तपास भरकटतो, मीडिया ट्रायल होतात आणि प्रकरणाची संवेदनशीलता कमी होते. यामुळे ज्या मुलींवर अन्याय झाला आणि ज्यांना ह्याची झळ सोसावी लागली आहे त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होते.
कुटुंबांना राजकीय प्रेरित प्रश्नांची उत्तरे द्यायला भाग पाडले जाते आणि त्यांच्या त्रासात आणखीनच भर पडते. एक लक्षात ठेवा की आरोपी हा फक्त शाळेचा कर्मचारी आहे, त्याला अटक करण्यात आली आहे आणि त्याच्यावर कायद्यानुसार कठोर खटला चालवला जाईल.
शाळेच्या विश्वस्तांना देखरेखीसाठी दोष दिला जाऊ शकतो परंतु त्यांच्या कृतीसाठी दोष देता येणार नाही. घटनेचे लक्ष दुसरीकडे वळवणे आणि गुन्ह्याची दिशा भरकटणे हे या संवेदनशील घटनेच्या दृष्टीने अतिशय अयोग्य राहील. राजकीय सूडबुद्धीचे इतके प्रचंड प्रमाण वाढले आहे की काही राजकारण्यांनी तर मर्यादांचे भानच सोडून दिले आहे. आरोप- प्रत्यारोप करण्यापेक्षा श्री. उद्धव ठाकरे यांच्या सारख्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. त्यांच्या राजकीय पक्षाचे सदस्य हे महिला आणि मुलांवरील लैंगिक अत्याचारामध्ये दोषी नसतील याची खात्री करणेच शहाणपणाचे ठरेल.
सरकारने कृतीशील राहून महिला आणि बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांवर कठोरपणे कारवाई केली पाहिजे. पोलिसांनी तपासामध्ये अधिक प्रभावी आणि कार्यक्षम असण्याची गरज आहे. तसेच दोषींना विलंब न करता शिक्षा झाली पाहिजे. राज्यात महिलांच्या सुरक्षित भविष्यासाठी कडक कारवाई करून एक महत्त्वाचे उदाहरण समोर ठेवण्याची जबाबदारी सरकारवर आहे. आरोपींची अटक हे योग्य दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.
सरकारसोबत सहकार्य करण्याची आणि लैंगिक हिंसाचाराबद्दल राज्यात जागरूकता वाढवण्याची जबाबदारी विरोधकांची सुद्धा आहे. लहान मुलांचा जीव धोक्यात असताना अफवा पसरवणे आणि चिखलफेक करणे अशा गोष्टी विरोधकांनी प्रामुख्याने टाळायला हव्यात. राज्याचे कल्याण करण्यासाठी विरोधी पक्षही तितकेच जबाबदार आहेत. सत्ताधारी पक्ष किंवा त्यांच्याशी संबंधित सदस्यांवर टीका हे एकमात्र काम विरोधी पक्षाचे नाही.
न्याय ही काळाची गरज आहे आणि आम्ही आशा करतो की तो न्याय त्वरीत दिला जाईल. न्याय मिळवण्याचे महत्त्वाचे साधन म्हणजे मुद्द्यावर लक्ष केंद्रित करणे आणि त्याचे राजकारण न करणे. ज्या शाळेत ही घटना घडली त्या शाळेमध्ये असुरक्षित वातावरण निर्माण करण्यात जे जबाबदार होते त्या सर्वांना या गुन्ह्यासाठी जबाबदार धरले पाहिजे, मग त्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध असेल. संपूर्ण देश योग्य रीतीने आपला राग व्यक्त करत असताना अशा घटनांवर राजकारण करणाऱ्यांनी ताबडतोब स्वतःला आवर घालायला हवा आणि हे भीतीचे वातावरण संपले पाहिजे.