मुंबई – गणेश तळेकर
बालरंगभूमी परिषद मुंबई आयोजित व बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखा नियोजित ‘यहाँ के हम सिकंदर’ हा दिव्यांग मुलांचा विविध कला गुणांचा महोत्सव दिनांक १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपार २ वेळेत यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल माटुंगा या ठिकाणी रंगणार आहे.
या महोत्सवात जिल्ह्यातील १३ दिव्यांग शाळांमधील २०० दिव्यांग बालकलावंत आपली कला सादर करणार आहेत. तसेच दिव्यांग मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थातर्फे बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री यावेळी करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे आकर्षण दिव्यांग मुलांचे सांस्कृतिक कला प्रदर्शनासोबतच परिषदेच्या अध्यक्ष सिने अभिनेत्री नीलम ताई शिर्के यावेळी उपस्थित राहणार आहेत.
बालरंगभूमी परिषद तर्फे नुकताच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात शालेय विद्यार्थ्यांसाठी जल्लोष लोककलेचा कार्यक्रम मोठ्या दणक्यात झाला या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध लोककलांचे दर्शन शालेय मुलांनी घडवले.
बालरंगभूमीचे स्वरूप केवळ मनोरंजनात्मक न राहता ती लोकचळवळ व्हायला हवी हा बालरंगभूमीचा मानस असून त्याचाच एक भाग म्हणून विशेष मुलांसाठी म्हणजे दिव्यांग मुलांसाठी ‘यहाँ के हम सिकंदर’ या कला महोत्सवाच्या माध्यमातून त्यांना सांस्कृतिक रंगमंच उपलब्ध करून देण्याचा बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड. नीलम शिर्के-सामंत यांचा मानस आहे.
तसेच दिव्यांग मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने कार्य करण्यासाठी व त्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांना सक्षम प्रवाहात आणण्यासाठी ॲड. नीलम शिर्के-सामंत यांच्या संकल्पनेतून सदर महोत्सव महाराष्ट्रभर आयोजित करण्यात येत आहे. सदर महोत्सवाचे आयोजन यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलनात होणार असून या महोत्सवाचे स्वरूप स्पर्धात्मक न राहता प्रोत्साहनात्मक राहणार आहे.
‘ या महोत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघास पाच हजार रुपये मानदेय, सन्मानचिन्ह तसेच सहभागी दिव्यांग कालावंतांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर सहभागी शाळेतील शिक्षकांचा देखील गौरव या ठिकाणी करण्यात येणार आहे. या महोत्सवांतर्गत विविध विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री या ठिकाणी करण्यात येणार असून या वस्तूंच्या विक्रीतून आलेली रक्कम त्या त्या शाळेलाच देण्यात येणार आहे.
महोत्सवाच्या अधिक माहितीसाठी हनुमान पाडमुख ७७३८९९१९९० संदीप रहाटे ९९८७००६००१ यांच्याशी संपर्क साधावा असे कळवण्यात आले आहे. सदर दिव्यांग मुलांच्या कलागुणांचे कौतुक करण्यासाठी , त्यांचा हुरुप वाढवण्यासाठी तसेच दिव्यांग शाळांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन पाहण्यासाठी व खरेदीसाठी कला प्रेमींनी, सामाजिक संघटना, दानशूर व्यक्तींनी या महोत्सवास भेट द्यावी असे आवाहन बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखेचे अध्यक्ष राजीव तुलालवार, कार्यावाह आसेफ अन्सारी, कार्याध्यक्ष ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती निसळ, उपाध्यक्ष सुनील सागवेकर आदींनी केले आहे.