तालुका प्रतिनिधी: (रामटेक) आज दिनांक २७ जुलै २०२३ रोजी सुर्यलक्ष्मी काॅटन मील, नगरधन येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत समतादूत प्रकल्प तालुका रामटेक व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ,शाखा रामटेकच्या वतीने ‘व्यसनमुक्त भारत’ या विषयावर कामगारांसाठी प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
व्यसन हे अनुकरणातून,मित्र संगतीने, आग्रहामुळे सुरू होते.परंतु यांचा परिणाम केवळ त्या व्यक्तीवर नव्हे तर परिवार, समाज व देशावर पडतो. पुढील पिढी सक्षम बनविण्यासाठी व्यसनमुक्त होण्याचा निर्धार करा असे आवाहन समतादूत राजेश राठोड यांनी केले. सर्व प्रथम महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सूर्यलक्ष्मी काॅटन मील चे उपाध्यक्ष भुजंगराव थोरात होते. प्रमुख अतिथी म्हणून उप व्यवस्थापक विजय वासनिक होते.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ शाखा रामटेकच्या संचालिका अनिता हडप यांनी केले. यावेळी उपस्थितांना राठोड यांनी व्यसनमुक्त होण्याची शपथ दिली.मंचावर मौदा तालुका समतादूत ओमप्रकाश डोले व दुर्योधन बगमारे तसेच शिशु मंदिर सेविका संगिता भुजाडे उपस्थित होते.यावेळी अनेक कामगारांनी व्यसनमुक्त होण्याचा संकल्प जाहीर केला.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सदर उपक्रमासाठी बार्टीचे महासंचालक सुनील वारे, विभाग प्रमुख डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण, निबंधक इंदिरा अस्वार, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक नसरीन तांबोळी व जिल्हा प्रकल्प अधिकारी ह्रदय गोडबोले यांचे मार्गदर्शन लाभले.