छत्रपती संभाजीनगर – सहकाऱ्याच्या आयडी पासवर्डचा गैरवापर करून डाक विभागाच्या सहायकाने एका ठेवीदाराच्या बँक खात्यातून ५ लाख ५८ हजार ४०० रुपये लंपास करून घोटाळा केला. गजानन प्रकाश शिराळ असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डाक निरीक्षक शिवलिंग जायेवार यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. एप्रिल २०२३ मध्ये ठेवीदार स्मिता भोकरे यांनी २०२० मध्ये शहागंज शाखेत बचत खाते उघडले होते. आरोपी शिराळने डाक सहायक पदावर असताना त्यांचे ते खाते चुकीच्या पद्धतीने बंद केले.
विभागीय चौकशीत सब पोस्ट मास्टर प्रकाश अहिरे यांनी दिलेल्या जबाबानुसार, त्यांच्या कामकाजासाठी वापरण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअरचा आयडी पासवर्डचा शिराळने परस्पर वापर केला. त्याद्वारे त्याने भोकरे यांच्या खात्यातील मोबाइल क्रमांकात बदल करून दुसरा मोबाइल क्रमांकाची नोंद केली. त्यानंतर दुसऱ्या शाखेत बदली होताच त्याने सर्व रक्कम काढून घेतली.
चौकशीत शिराळ दोषी
भोकरे यांनी तक्रार केल्यानंतर सहायक अधीक्षक एम.एस. वांगे व जायेवार यांनी चौकशी केली. त्यात शिराळ दोषी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना सदर रक्कम जमा करण्याची नोटीस बजावण्यात आली होती.
मात्र, त्याचेही पालन केले नाही. डाक विभागाला भाेकरे यांना व्याजासह ५ लाख ७१ हजार ५४७ रुपये अदा करावे लागले. त्यानंतर शिराळवर गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक निवृत्त गायके अधिक तपास करत आहेत.