Monday, December 23, 2024
Homeराजकीयविधानसभा निवडणूक २०२४ | मतदार यादीतील आपल्या नावासोबत स्वतःचा मोबाईल क्र. जोडून...

विधानसभा निवडणूक २०२४ | मतदार यादीतील आपल्या नावासोबत स्वतःचा मोबाईल क्र. जोडून घ्या…

अमरावती – दुर्वास रोकडे

महाराष्ट्र राज्यात होणार असलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने राज्यात यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. यात मतदारांसाठी दावे आणि हरकतींसाठी दि. 6 ऑगस्ट 2024 (मंगळवार) ते 20 ऑगस्ट 2024 (मंगळवार) हा कालावधी निश्चित केला गेला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत पात्र नव मतदारांच्या नोंदणीसह विद्यमान मतदारांसाठी मतदार यादीतील आपल्या तपशीलांमध्ये बदल, दुरुस्त्या, अद्ययावतीकरण करण्याची संधी देखील उपलब्ध आहे. यांपैकी एक महत्वाची बाब म्हणजे मतदारांनी मतदार यादीतील आपल्या नावासोबत स्वतःचा मोबाईल क्र. जोडून घेणे हा होय.

मतदार यादीतील आपल्या नावासोबत मोबाईल क्र. जोडण्याचे फायदे

निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी विविध सूचना आणि माहिती पाठविली जाते. त्यामध्ये मतदान केंद्र, मतदानाची तारीख, मतदानाची वेळ इत्यादी महत्त्वाची माहिती समाविष्ट असते. मतदानाच्या दिवशी आपला वेळ वाचवण्यासोबतच, विनासायास मताधिकार बजावण्यास ही माहिती कामी येते. भारत निवडणूक आयोगाकडून मतदारांसाठी वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचना आणि निर्देशांची माहिती प्राप्त होते.

भारत निवडणूक आयोगाच्या वतीने राबवले जाणारे मतदार सर्वेक्षणासारखे उपक्रम, मतदारांचे नाव मतदार यादीतून वगळण्यासंदर्भातील अर्जावरील कार्यवाही याबाबतच्या सूचना-नोटीस, पंचनाम्याची सूचना (असेल तर) प्राप्त होते, आणि संभाव्य कार्यवाही सुलभ होते.

आपला मोबाईल क्रमांक अद्ययावत केल्यास, भारत निवडणूक आयोगाच्या electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळाद्वारे तसेच Voter Helpline ॲपद्वारे मतदार यादीतील आपल्या नावाचा सुलभतेने शोध घेता येता. इ – मतदार ओळखपत्र डाऊनलोड करता येते.

मतदारांसाठी महत्वाचे

पूर्वी मतदार नोंदणीसह मतदारांशी संबंधित इतर सेवांची प्रक्रिया प्रामुख्याने ऑफलाइन पद्धतीनेच चालत असे, तसेच देशात मोबाईलचा वापर सुरू झाल्याच्या सुरुवातीच्या काळात मोबाईल वापरकर्त्यांची संख्याच अत्यंत नगण्य होती. त्यामुळेच याआधी नोंदणी झालेल्या बहुतांश मतदार ओळखपत्रधारकांचे मोबाईल क्र. त्यांच्या नावासोबत जोडलेले नाहीत. यासोबतच ऑनलाईन पद्धतीत एकाच मोबाईल क्रमांकाचा वापर करून एकापेक्षा अधिक जणांचे मतदार नोंदणी अर्ज भरले जातात.

अशावेळी सदर मोबाईल क्र. हा विशिष्ट मतदारापुरताच मर्यादित नसल्याने, तो कोणाही मतदाराच्या नावासोबत त्याचा विशिष्ट म्हणजेच युनिक मोबाईल क्र. म्हणून जोडला जात नाही. हे टाळण्यासाठी एका मोबाइल क्रमांकाचा वापर फक्त एकाच मतदार ओळखपत्रासाठी केला जावा. त्यामुळे विद्यमान मतदारांसह ज्यांच्या मतदार यादीतील नावासोबत त्यांचा विशिष्ट अर्थात युनिक मोबाईल क्रमांक जोडलेला नाही. त्यांनी अर्ज क्र. 8 भरून आपल्या नावासोबत मोबाईल क्र. जोडून घेणे मतदारांच्या हिताचे आहे.

मतदार यादीतील आपल्या नावासोबत मोबाईल क्र. जोडण्यासाठीचे पर्याय

1) नव मतदार नोंदणीचा अर्ज भरताना

नव मतदार नोंदणीचा अर्ज भरताना आपल्याला अर्जात स्वतःचा मोबाईल क्र. देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्याचवेळी आपण इतर कोणत्याही मतदार ओळखपत्रासाठी वापरला न गेलेला असा स्वतःचा मोबाईल क्र. दिला तर तो मतदार यादीत आपल्या नावासोबत जोडला जातो.

2) विद्यमान नोंदणीकृत मतदारांसाठी अर्ज क्र. 8

भारत निवडणूक आयोगाच्या मतदारांकरता असलेल्या अर्ज क्र. 8 मध्ये मतदार यादीतील वैयक्तिक तपशीलांमधील बदल, दुरुस्त्या आणि अद्ययावतीकरणाअंतर्गत मतदार यादीत आपल्या नावासोबत मोबाईल क्र. जोडण्याचा पर्याय दिला आहे. हा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने भरता येतो.
ऑनलाईन अर्ज भरण्याकरता www.voters.eci.gov.in हे संकेतस्थळ किंवा Voter Helpline हे मोबाईल ॲप वापरता येते. या व्यासपीठांवर लॉगीन केल्यावर अर्ज क्र. 8 निवडून,

त्यात ‘Correction of Entries in Electoral Roll’ या सुविधेअंतर्गत, आपल्या नावासोबत मोबाईल क्र. जोडण्याचा पर्याय मिळतो.
ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी मतदार जवळच्या मतदार नोंदणी कार्यालयालात जाऊन, तसेच विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमादरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या विशेष शिबिरांमध्येही ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरू शकतील.

आपण आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता आणि त्यांनाही मतदार यादीतील आपल्या नावासोबत मोबाईल क्र. जोडून देण्याची विनंती करू शकता.
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील आपल्या नावासमोर स्वत:चा मोबाईल क्रमांक जोडून घेणे मतदारांच्या हिताचे आहे. यासाठी मतदारांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे. 

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: